शिक्रापूर – राज्यात करोना संसर्गाने थैमान घातलं आहे. मागील काही दिवसांत करोना रुग्णांच्या संख्येत काही प्रमाणात घट झाली आहे. मात्र मृत्यूंचं प्रमाण अद्याप अटोक्यात आलेलं नाही. करोनामुळे कुटुंबच्या कुटुंब उध्वस्त होत आहेत. त्यातच दिवंगत नेते रमेश वांजळे यांच्या दोन सख्ख्या मेव्हुण्यांचा करोनाने मृत्यू झाला आहे.
52 वर्षीय सतीश कुंडलिक गवारे आणि 47 वर्षीय दत्तात्रय कुंडलिक गवारे अशी या भांवडांची नावं आहेत. अवघ्या बारा तासांच्या अंतरानं या दोन्ही सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे. घरातील दोन कर्ते पुरुष गेल्यानं कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सतीश गवारे आणि दत्तात्रय गवारे हे दोघे दिवंगत रमेश वांजळे यांच्या पत्नी हर्षदा वांजळे यांचे संख्खे भाऊ होते. त्यांनी देखील आपल्या भावासाठी धावपळ केली. मात्र करोनाने दोघा भावांचा बळी घेतली.
दोन्ही भावांना करोनाची लागण झाली होती. सतीश गवारे यांच्यावर पुण्याजवळील उरळी कांचन याठिकाणी उपचार सुरू होते. तर लहान भाऊ दत्तात्रय यांच्यावर शिक्रापूर येथील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. अचानक प्रकृती बिघडल्यानं दोघांना पुण्यातील रुग्णलयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचार सुरू असताना 17 मे च्या रात्री सतीश गवारे यांचं निधन झालं. तर दुसऱ्या दिवशी सकाळी 18 मे रोजी दत्तात्रय गवारे यांनी अखेरचा श्वास घेतला.