- दर्शनासाठी नागरिकांनी लावल्या रांगा
- कार्ला आई एकवीरादेवी मंदिरात घटस्थापना
कार्ला– महाराष्ट्रातील लाखोभाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कार्ला वेहरगाव येथील कुलस्वामिनी आई एकवीरा देवीचे मंदिर तब्बल दीडवर्षाने भाविकांसाठी खुले झाले आहे. नवरात्रोत्सवाच्या दिवशी आईचे मंदिर खुले झाल्याने भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत. गुरुवारी (दि.7) घटस्थापनेने शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे.
वेहेरगाव दहिवली सरपंच अर्चना देवकर, उपसरपंच काजल पडवळ, पोलीस पाटील अनिल पडवळ, सदस्या योगिता पडवळ, मुख्य पुजारी संजय गोविलकर, गुरव प्रतिनिधी नवनाथ देशमुख, काळूराम देशमुख, राजू देशमुख, मनोज देशमुख, गणपत पडवळ, मधुकर पडवळ, अशोक कुटे, संदीप देवकर, मोरेश्वर पडवळ, शरद कुटे, नवनाथ पडवळ, सचिन देशमुख यांच्यासह गुरव व पुजारी प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत घटस्थापना करण्यात आली. नंतर सकाळची आरती घेऊन नवरात्रोत्सवाला सुरवात झाली.
मागील दीडवर्षापासून बंद असलेली मंदिरे घटस्थापनेच्या मुहूर्तावर भाविकांसाठी खुले झाले आहे. महाराष्ट्रातील तमाम आगरी कोळी, कुणबी समाजाची तसेच ठाकरे घराण्याची कुलदैवत असणाऱ्या कार्ला एकवीरा देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या. एकवीरादेवी मंदिर उघडणार असल्याने नवरात्रोत्सव सुरु होत असल्याने लोणावळा पोलीस प्रशासनाच्या वतीने बुधवारी रात्रीपासूनच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. एकवीरा देवस्थानचे प्रशासकीय व्यवस्थापक मंगेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली बाळू गायकवाड, अरुण देवकर यांच्यासह एकवीरा देवस्थानचे कर्मचारी यांनी मंदिर परिसरात सुखसुविधा तसेच स्वच्छता राखण्यासाठी प्रयत्न करत आहे.