संजय कडू
पुणे – सायबर पोलीस ठाण्यामध्ये दाखल होणाऱ्या गुन्हयांमध्यस सर्वाधिक गुन्हे हे ऑनलाईन आर्थिक फसवणुकीचे आहेत. विशेष म्हणजे यामध्ये उच्च शिक्षीत वर्ग मोठ्या प्रमाणात फसला आहे. ही रक्कम अवघ्या ७६ गुन्ह्यांमध्ये जवळपास ४१ कोटी ३३ लाख ९४ हजार इतकी आहे. यातील केवळ ३ लाख ५५ हजार रुपयांचीच रक्कम पोलिसांना रिफंड करता आली आहे. तर ४ कोटी १५ लाख ६८ हजार रुपये फ्रिज (खाते गोठवले) करता आले आहेत.
तक्रारदार फसले गेल्यानंतर पैसे परत मिळतील या आशेने सायबर भामट्यांशी संपर्कात असतात. मात्र, सायबर भामट्यांकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यावर पोलिसांकडे धाव घेतात. तो पर्यंत खूप उशीर झालेला असतो. रक्कम खात्यातून वर्ग झाल्यानंतर दोन तीन तासातच जर सायबर पोलिसांकडे धाव घेतली. तर, रक्कम रिफंड किंवा फ्रिज करता येऊ शकते. मात्र, हे गोल्डन अवर्स तक्रारदार लक्षात घेत नाहीत.
सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सायबर भामटे दरवेळी वेगवेगळे फंडे शोधून नागरिकांना गंडा घालत असतात. यामुळे सायबर पोलिसांनी कितीही जनजागृती केली तरी नागरिक अलगद चोरट्यांच्या जाळ्यात सापडतात. विशेषत:हा फसले गेलेल्यांमध्ये आयटीतील तरुणाईची संख्या जास्त आहे. यापुर्वी एमएसईबी आणि केवायसी फ्रॉड मोठ्या प्रमाणात होत होते. वीज बिल थकल्याचे मेसेज पाठवून ते तातडीने न भरल्यास वीज कट करण्यात येईल, असे संदेश सर्रास पाठवले जात होते. या संदेशाला भुलून अनेकांनी आपली बँक खाती रिकामी केली आहेत.
तसेच केवायसी अपडेट करण्याचे संदेश पाठवून बँकेसंदर्भात सर्व माहिती घेऊन तसेच ओटीपीही घेऊन बँक खात्यातून परस्पर सायबर भामटे रक्कम काढून घेत होते. यानंतर लोन अॅपचे प्रकार सुरू झाले. यामध्ये तर धमकावणी, ब्लॅकमेलिंगसारखे प्रकारही घडले. लोन अॅप प्रकारामुळे देशभरात अनेकांनी आत्महत्याही केल्या होत्या. केंद्र सरकारने ही बाब गांभीर्याने घेऊन त्यावर उपाय योजल्याने सध्या लोन अॅपचे प्रकार जवळपास बंदच झाले आहेत. या प्रकारामध्ये ज्या काही तक्रारदारांनी पैसे गेल्या गेल्या पोलीस ठाण्यात धाव घेतली, त्यांना त्यांचे पैसे रिफंड मिळाले.
मात्र, उशीर करणाऱ्यांना ते परत मिळवून देता आले नाही. सायबर भामटे त्यांच्या खात्यात रक्कम वर्ग होताच ती तातडीने काढून घेतात. त्यांनी खोललेले बॅक खाते हे एकतर कमिशन देऊन किंवा बनावट कागदपत्रे देऊन खोललेले असते. यामुळे मोठी रक्कम मिळताच खातेही बंद होते तसेच सिमकार्डही बंद केले जाते. हे सर्व उद्योग पुर्वेकडील राज्यात बसून केले जातात.
- ७६ गुन्ह्यांमध्ये ४१ कोटी ३३ लाख ९४ हजार रुपये अडकले
- ३ लाख ५५ हजार रुपयांचीच रक्कम रिफंड होऊ शकली
टास्क फ्रॉड जोरात ; आयटीतील पीढी कोमात
एसएसईबी आणि केवायसी फ्रॉडसंदर्भात नागरिक जागरुक झाल्यानंतर सायबर भामट्यांनी टास्क फ्रॉडकडे मोर्चा वळवला आहे. येथे त्यांनी आयटीतील पार्ट टाईम जॉब शोधणाऱ्यांना टार्गेट केले आहे. सुरुवातीला एखादी लिंक किंवा युट्युब व्हिडिओ लाईक करण्याचा टास्क देत १० ते ५० रुपये प्रति लाईकला दिले जातात. काही दिवस ही रक्कम खात्यावर वर्ग केली जाते. यानंतर समोरच्या व्यक्तीचा विश्वास संपादन करून त्याला बीटकॉईन व इतर आभासी चलनामध्ये जास्त फायदा देण्याचे आमिष दाखवत गुंतवणूक करण्यास भाग पाडले जाते. यानंतर काही लाखांची रक्कम ऑनलाइन वर्ग करून फसवणूक केली जाते.
ही रक्कम रिकव्हर होणे तसेच मुख्य आरोपीपर्यंत पोहचणे खूपच अवघड असते. सायबर पोलिसांनी टास्कफ्रॉडमध्ये सध्या एक टोळी पकडली आहे. हे फ्रॉड करणारे कमिशन देऊन दुसऱ्याचे बँक खाते वापरतात. त्या खातेधारकारकास पाच ते दहा टक्के रक्कम देतात. उर्वरित रक्कम त्याच्या खात्यातून थेट परदेशातील बँक खात्यात वर्ग करून घेतात. यानंतर ही रक्कम बीटकॉईनमध्ये वर्ग केली जाते. ही खाती सिंगापूर आणि चीन येथून ऑपरेट होत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे वर्ग झालेली फसवणुकीची रक्कम रिकव्हर होणे जवळपास अशक्यच आहे.
“सायबर पोलीस ठाण्यात वर्षभरात ९८ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातील ७६ गुन्हे आर्थिक फसवणुकीचे तर २२ सोशल मिडिया व इतर आहेत. फसले गेलेले नागरिक तक्रार देण्यास खूप उशिराने येतात. फसली गेलेली रक्कम भामटे एक दोन तासातच बँक खात्यातून काढून घेतात. यामुळे नागरिकांनी अशी फसवणूक झाल्यास तातडीने पोलिसांत धाव घेतल्यास रक्कम फ्रिज किंवा रिफंड मिळवून देता येऊ शकते.” – मीनल सुपे-पाटील (वरिष्ठ पोलीस निरीक्षक सायबर पोलीस स्टेशन)