गड्या, 1972पेक्षा मोठा दुष्काळ

सविंदणे परिसरातील वयोवृद्ध शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया

सविंदणे – डिंभा धरणाच्या आवर्तनाचे योग्य नियोजन न केल्यामुळे जलसंकट उभे राहिले आहे. डिंभा धरणामध्ये सध्या पाणीसाठा उपलब्ध नाही. त्यामुळे नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. “गड्या, 1972 पेक्षा मोठा दुष्काळ पडला आहे’, अशी प्रतिक्रिया वयोवृद्ध शेतकऱ्यांनी दिली.

आंबेगाव, शिरूर तालुक्‍यातील नागरिकांपुढे पाऊस लांबल्याने दुष्काळाचे भीषण सावट उभे ठाकले आहे. पिण्याच्या पाण्याचा, चाऱ्याचा मोठा प्रश्‍न उभा आहे. डिंभा धरणाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे व मनमानी कारभारामुळे पाणी वाटपामध्ये नियोजन नसल्यामुळे बऱ्याच गावांना पुरेसे पाणी मिळाले नाही.

टाकळी हाजी, कवठे येमाई, मलठण, जांबुत, पिंपरखेड, आमदाबाद, सविंदणे याठिकाणी चाऱ्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न उभा ठाकला आहे. या भागात अजून चारा छावण्या उभाराव्यात, अशी मागणी माजी आमदार पोपटराव गावडे यांनी केली आहे.

सध्या भीमाशंकर कारखान्यातर्फे टाकळी हाजी येथे चारा छावणी उभारली आहे. या भागात पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर सुरू करावेत, अशी मागणी माजी आमदार गावडे यांनी केली आहे.

दरम्यान, आमदार दिलीप वळसे पाटील यांनी तहसील कार्यालयात अधिकाऱ्यांची दुष्काळ निवारणाबाबत आढावा बैठक घेतली आहे. शिरूर तालुक्‍यात टंचाई निवारणासाठी कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. सध्या कृषी सहायक, तलाठी यांच्यामार्फत पाण्याअभावी जळालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे काम हाती घेतले आहे. शेतकऱ्यांनी पंचनामे करण्याकामी सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार गुरु बिराजदार यांनी केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.