शतक पार केलेल्या शंकर मेटेंची एकत्र कुटुंब पद्धत आदर्शवत् : 70 सदस्यांचा गोतावळा
– जालिंदर आदक
तळेगाव ढमढेरे – शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील शंकर गोपाळ मेटे 108 व्या वर्षांत पर्दापण केले आहे. आजही त्यांची शरीरयष्टी ठणठणीत आहे. सर्व इंद्रिये व्यवस्थित काम करतात. 18 पतवंडांचा सहवास लाभलेले शंकर मेटे हे तळेगाव ढमढेरे येथील एकत्र कुटुंब पद्धतीचा आदर्श परिपाठ आहे. मेटे यांच्या कुटुंबात 70 सदस्य असताना त्यांची फुलासाठी काळजी घेत आहेत. समतोल आहार व्यायाम आणि वेळेत काम, याला जास्त महत्त्व देत आल्यामुळे शतकोत्तर आयुष्य जगत येत आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
1955 पूर्वीच्या काळातील लोक पौष्टीक आहार घेत होते. त्यावेळी पर्यावरणाचा समतोल असल्यामुळे स्वच्छ हवा, नियमित व्यायामाच्या बळावर त्यांची आरोग्य पत्रिका सदृढ होती. एकत्र कुटुंब पद्धतीचा एकोपा हा महत्वाचा होता. त्यानंतर 1980- 1990 नंतर लोकांच्या राहणीमानात बदल होत गेले. शारिरीक कष्टाची कामांची जागा यांत्रिकीकरणाने घेतली. त्यानंतर आपोआप श्रमाची कामे कमी होत गेली. सात्वीक पदार्थांची जागा फास्ट फूडने घेतली. 1990 नंतर लोकांच्या राहणीमानात बदल होत गेले. तसेच पूर्वीच्या काळातील आहार, विचार लोप पावत गेला. 20 वर्षांत फास्ट फूडमुळे आरोग्याच्या समस्या शरारीला पोखरून गेल्या. त्यात बऱ्याच जणांना औषध आणि उपचारांवरच आयुष्य जगावे लागत आहे. शतक पार केलेल्यांची संख्या अगदी हाताच्या बोटावर आहे. त्यात तळेगावचे शंकर मेटे यांचे नाव पंचक्रोशीत परिचित आहे. वयाच्या 104 वर्षापर्यंत शिंपीकाम करीत त्यांनी संसाराचा गाडा हाकला आहे. आजही 108 वयात त्यांना सुईमध्ये दोरा ओवता येत आहे. डिजीटल युगातील त्यांचा डोळसपणा वाखाणण्याजोगा आहे.
शंकर मेटे यांचा जन्म 1911 मध्ये झाला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात धगधगता इतिहास त्यांनी जवळून न्याहळला आहे. त्याकाळी लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू यांना पाहिले आहे.
तळेगाव ढमढेरे परिसरातील ते स्वातंत्र्याचे साक्षीदार आहेत. मेटे कुटुंबीयांची जडणघडण ही एकत्र कुटुंब पद्धतीत झाली आहे. स्नेह, आपुलकी, आत्मीयता ही मेटे कुटुंबीयांचा पाया आहे. त्यातून शंकर मेटे यांनी कुटुंबातील प्रत्येकांना जीवनात आकार दिला आहे. त्यांना आतापर्यंत चार पिढ्यांचा सहवास लाभला आहे. त्यात 18 पतवंडे, 13 नातू, 5 मुले अशा कुटुंबांमध्ये एकूण 70 सदस्य आहेत. आजही मेटे ठणठणीत आहेत. त्यांचे चिरंजीव राजेंद्र मेटे हे त्यांची सेवा करतात. घरातील वातावरण शांत असल्यामुळे वादविवाद नसल्याचे मेटे यांनी सांगितले.