न्हावरे(प्रतिनिधी) – शिरूर तालुक्याच्या पूर्व भागात आज (दि.०२) काही ठिकाणी सायंकाळच्या वेळेस तर काही ठिकाणी संध्याकाळच्या सुमारास मध्यम व मुसळधार स्वरूपाचा पाऊस झाला.त्यामुळे रोहिणी नक्षत्राच्या सुरुवातीलाच पावसाचे आगमन झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे व उत्साहाचे वातावरण आहे.
उरळगाव,दहिवडी,पारोडी या ठिकाणी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. तर न्हावरे, आंबळे, कर्डे, निर्वी, आलेगाव पागा, आंधळगाव, कुरुळी,नागरगाव, वडगाव रासाई, मांडवगण फराटा, इनामगाव इत्यादी ठिकाणी आज संध्याकाळी ८ वाजण्याच्या दरम्यान मुसळधार पाऊस झाला.
भयंकर उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना आज झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. तसेच अनेक वर्षांनी जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाचे आगमन झाले आहे.असे शेतकऱ्यांनी सांगितले.पावसाने पुढील काही दिवसांमध्ये अशाच स्वरूपाची हजेरी लावल्यास शेतकऱ्यांच्या खरीपाच्या बाजरी व मुगाच्या पेरण्या वेळेत होतील.असा अंदाज शेतकरी वर्गातून वर्तवला जात आहे.