पिंपरी (प्रतिनिधी) : पिंपरी-चिंचवड शहरात सलग तिसऱ्या दिवशी मंगळवारी पावसाने हजेरी लावली. सायंकाळनंतर सुरू झालेला पाऊस गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत खूपच जोरदार होता. त्यामुळे सखल भागात ठिकठिकाणी पाणी साचले होते.
आज सकाळपासूनच आकाशात ढगांनी गर्दी केली होती. परंतु सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाला सुरवात झाली. त्यामुळे दुचाकी चालकांची एकच तारांबळ उडाली. शहरातील दुकाने व बाजारपेठा सायंकाळी पाच वाजताच बंद होत असल्याने बाजारपेठांमध्ये तुरळक गर्दी होती. अचानक आलेल्या पावसाने दुकानदारांची मात्र चांगलीच धांदल उडाली.
पिंपरी-साई चौकाजवळील भुयारी मार्गात, पिंपरी कॅम्पातील अंतर्गत रस्त्यांवर काही ठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे तेथून ये-जा करताना वाहनचालकांची गैरसोय होत होती. त्याशिवाय, विविध भागांतील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. त्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागत होती. काही ठिकाणी ड्रेनेजचे पाणी वाहून रस्त्यावर आले होते. रात्री उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता.