विरोधकांचा चहापानावर बहिष्कार कायम
मुंबई – राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने मंत्रिपदांची शपथ घेत सत्तेत सहभागी होण्याच्या घेतलेल्या निर्णयानंतर प्रथमच महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर विरोधक एकवटले असून त्यांनी चहापानावर बहिष्कार टाकला आहे. यंदाचे पावसाळी अधिवेशन 17 जुलै ते 14 ऑगस्ट दरम्यान 15 दिवस चालणार आहे. दरम्यान, राज्यातील सध्याच्या गुंत्यामुळे यंदाचे पावसाळी अधिवेशन वादळी होण्याची शक्यता आहे.
पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नेहमीप्रमाणे सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित चहापान कार्यक्रम होणार होता. पण विरोधकांनी या कार्यक्रमावर बहिष्कार घातला. लोकशाहीच्या प्रथा, परंपरेप्रमाणे विधीमंडळाच्या पूर्वसंध्येला आयोजित चहापान कार्यक्रमास उपस्थित राहून राज्यासमोरील प्रश्नांबाबत विचारविमर्श करण्यास आम्हाला निश्चितच आवडले असते. परंतु, गत वर्षभरात राज्यातील घडामोडी पाहता राज्यात आणि देशात लोकशाही शिल्लक उरली नसल्याचे भेसूर चित्र समोर येत आहे.
विरोधी गटातील राजकीय पक्ष फोडून, पक्षच पळवून नेण्याचे सुरु असलेले राजकारण पाहता राजकीय दर्जाच घसरलेला आहे. विरोधी पक्षातील नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल करायचे, तपास यंत्रणावर दबाब टाकून त्यांच्यावर कारवाई करायची, विरोधकांना नामोहरम करुन आपल्यासोबत येण्यास भाग पाडायचे, जे येणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करायची, जे येतील त्यांना संरक्षण द्यायचे आणि त्यांना निर्दोषत्वाचे सर्टीफिकेट देऊन पवित्र करुन टाकायचे, हे सारं लोकशाहीसाठी मारक आहे, याचीही नोंद विधिमंडळाच्या या अधिवेशनाच्या निमित्ताने घेण्यात यावी, असे विरोधकांनी म्हटले आहे.
शिंदे गट मागच्या रांगेत
विधिमंडळ सभागृहात मंत्र्यांच्या ज्येष्ठतेनुसार आसन व्यवस्था केली जाते. शिंदे गट व भाजपच्या मंत्र्यांपेक्षा राष्ट्रवादीचे मंत्री ज्येष्ठ आहेत. या ज्येष्ठतेनुसार छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना पहिल्या रांगेत बसण्याचा मान मिळेल. त्यामुळे सध्या पहिल्या रांगेत बसत असलेल्या शिंदे गट व भाजपच्या मंत्र्यांना दुसऱ्या, तिसऱ्या रांगेत ढकलले जाणार आहे.
दोन उपमुख्यमंत्र्यांसाठी आसन व्यवस्था
अजित पवार सत्तेत गेल्याने राज्यात प्रथमच दोन उपमुख्यमंत्री पदे निर्माण झालेली आहेत. या अधिवेशनात दोन उपमुख्यंत्र्यांसाठी दोन आसने निर्माण करावी लागतील. उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा ज्येष्ठ आहेत, पण देवेंद्र फडणवीस हे माजी मुख्यमंत्री असल्याने त्यांची आसन व्यवस्था मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शेजारी असणार आहे.
विरोधी पक्षनेता कोण?
अजित पवार सत्ताधारी पक्षात गेल्याने विधानसभेत विरोधी पक्षनेते पद रिकामे आहे. यामुळे आमदारांच्या संख्याबळानुसार कॉंग्रेस विरोधी पक्षनेते पदावर दावा करणार आहेत. मात्र, नेता कोण असणार? याबाबत अजूनही संभ्रम आहे. आक्रमकपणे भूमिका मांडणाऱ्याला विरोधी पक्षनेता करावा, असा सूर ठाकरे गट व राष्ट्रवादीतून काढला जात आहे.
विरोधी बाकांवर हे नेते बसतील
विधानसभेत विरोधी बाकांवर भास्कर जाधव, सुनील प्रभू, रवींद्र वायकर, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण असे दिग्गज नेते, तर विधान परिषदेत उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विलास पोतनीस, सचिन अहिर, शेकापचे जयंत पाटील, बंटी पाटील, भाई जगताप, एकनाथ खडसे, शशिकांत शिंदे अशी विरोधकांची फळी आहे. विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त बारा जागा रिक्त असल्यामुळे या सभागृहात विरोधकांचे बहुमत आहे.
विरोधक या मुद्द्यांवर सरकारला घेरणार
* लांबलेला पाऊस, दुबार पेरणीचे संकट, बोगस बियाणे, शेतकऱ्यांना मिळणारी अपुरी मदत
* कोयता गॅंगची वाढती दहशत, महिला अत्याचार
* महसूल व शिक्षकांच्या बदल्यांमधील भ्रष्टाचार
* मंत्री अब्दुल सत्तार, संजय राठोड यांचे घोटाळे
* महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळे गेलेल्या बळींबाबत चौकशीत चालढकल
* समृद्धी महामार्गावरील वाढते अपघात
* राज्यातील वाढती बेकारी आणि राज्याबाहेर जाणारे उद्योग
* मुंबई महापालिका भ्रष्टाचार, शिवसेना शाखेवरील हल्ला
* सारथी, महानंद संस्थेचे खच्चीकरण
* एसटी कामगार महागाई भत्ता