पुणे -राज्यातील तीन कोटी पशुधन जपण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे. पशुखाद्य दर 25 टक्यांनी कमी करावे, असे पशुखाद्य उत्पादकांना आवाहन करण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे. पशुपालन व दूध उत्पादन व्यवसायामध्ये पशुखाद्याची गुणवत्ता ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. उत्पादित दुधाचे प्रमाण व त्याची गुणवत्ता, त्याचप्रमाणे पशुंचे आरोग्य आणि पुनरुत्पादन क्षमता ही पशुखाद्याच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. त्यामुळे फुड्स सेफ्टी ऍण्ड स्टॅण्डर्डस् ऑफ इंडिया या संस्थेच्या निर्देशानुसार राज्यात आयएसआय मार्क पशुखाद्याचे उत्पादन व विक्री करणे बंधनकारक केले आहे.
भारतीय मानक संस्थेच्या (बीआयएस) परवानाधारक पशुखाद्य उत्पादक संस्थांनीही भारतीय मानक संस्थेच्या प्रमाणकाप्रमाणेच पशुखाद्याचे उत्पादन करावे आणि पशुखाद्याच्या पॅकिंग बॅगवर पशुखाद्यातील अन्नघटकाचे प्रमाण (उदा. क्रुड प्रोटीन, क्रुड फॅट, क्रुड फायबर, कॅल्शियम, फॉस्फरस, मॉइश्चर, इत्यादी) ठळकपणे नमूद करणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे अन्नघटकांच्या प्रमाणकासोबत पॅकिंग बॅगवर उत्पादक संस्थेचे नाव व पत्ता, उत्पादक परवाना क्रमांक, पशुखाद्य उत्पादनाचा दिनांक व बॅच क्रमांक, सदर उत्पादन वापरण्याचा अंतिम दिनांक, निव्वळ वजन, विपणन (मार्केटिंग) कंपनीचे नाव व पत्ता या बाबीही ठळकपणे नमूद कराव्यात, असे आदेश देण्यात आले असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.