निवडणुकीत “धन’ सापडले, “धनी’ मात्र मोकळेच

निवडणूक काळात मावळ मतदारसंघातून 28 लाखांची रोकड जप्त
पैसे “व्यापारा’च्या नावावर खपवण्याची शक्‍कल
पिंपरी – निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून मतदान होईपर्यंत मावळ लोकसभा मतदारसंघात वेगवेगळ्या 10 घटनांमध्ये सुमारे 28 लाख रुपयांची रोख रक्‍कम जप्त करण्यात आली. एका गावावरून दुसऱ्या गावाला गाडीतून नेण्यात येत असलेली ही रक्कम मतदारांना वाटण्यासाठी होती का, या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत अधिकारी अजून पोहचलेच नाहीत. त्यामुळे, सध्या तरी पकडण्यात आलेले पैसे “व्यापाऱ्यांचे’ होते असा दावा केला जात आहे. त्यामुळे निवडणुकीत काळात धन सापडले मात्र या धनाचे खरे “धनी’ अद्याप सापडले नसल्याचे समोर येत आहे.

निवडणुकीच्या काळात चेकपोस्ट आणि नाक्‍यांवर पोलिसांमार्फत तपासणी केली जाते. या तपासणीच्या कालावधीत सापडलेल्या पैशाच्या नोंदी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे नोंदविल्या गेल्या. या प्रत्येक घटनेत सापडलेली रक्कम नक्की कोठून आली? वाहतूक करणारा कोण होता? मालक कोण? याची तपासणी प्राप्तीकर विभागाच्या अंगाने करण्यात येते. काही प्रकरणांमध्ये प्राप्तीकर चुकविल्याचे अहवाल पाठविण्यात आले. वेगवेगळ्या पथकांमार्फत होणाऱ्या तपासण्यांमुळे प्रमुख राजकीय पक्षांची नेतेमंडळी “पैसे’वाटताना किमान काळजी घेतील, असे अभिप्रेत होते. सापडलेली रक्कम व्यापारासाठी काढली, अशी कागदपत्रे सादर केली की, ती संबंधितांना परत केली जाते. त्याचा पद्धतशीर फायदा-गैरफायदा घेतला जातो. असाच प्रकार मावळ मतदारसंघातही पहायला मिळला आहे.

यावेळी मावळ लोकसभा मतदारसंघात अतितटीची लढत होणार असल्यामुळे निवडणूक विभागही दक्ष होता. प्रमुख उमेदवार कोट्याधीश-अब्जाधीश असल्याने पैशाचा वापर मोठ्या प्रमाणात होणार हे ग्राह्य धरुन वेगवेगळ्या पथकाच्या मार्फत निवडणूक प्रक्रियेवर नजर ठेवण्यात आली होती. तसेच तपासणी नाके उभारून कसून तपासणी करण्यात येत होती. या काळात मावळ मतदारसंघातून तब्बल 28 लाख 28 हजार रुपयांची रोकड जप्त केली. वाहनाच्या तपासणी दरम्यान एवढ्या मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केल्यामुळे या रकमेचा वापर कशासाठी करण्यात येत होता याचा शोध सध्या निवडणूक विभाग घेत आहे.

प्राप्तीकर खात्यामार्फत तपासणी
मावळ लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक 13 लाख रुपये मावळ परिसरातून जप्त करण्यात आले. त्यापाठोपाठ पनवेल विधानसभा मतदारसंघातून साडेनऊ लाख रुपये, उरणमधून तीन लाख 21 हजार रुपये, चिंचवडमधून एक लाख 97 हजार रुपये आणि पिंपरीमधून 48 हजार 500 रुपये जप्त करण्यात आले. ही कारवाई 19 ते 28 एप्रिलदरम्यान करण्यात आली. अशा प्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी आयोगाने 28 तपासणी नाके उभारले होते. या ठिकाणी संशयित वाहनांची कसून तपासणी करण्यात येत होती. त्याचे चित्रीकरणदेखील करण्यात आले आहे. विषेश म्हणजे हे पैसे जप्त करण्यात आल्यानंतर त्याची तपासणी प्राप्तीकर खात्याच्या मार्फत करण्यात येते. आता हे जप्त करण्यात आलेले पैसे कशासाठी वापरण्यात येत होते याचा तपास प्राप्तीकर विभाग करीत आहे. त्यामुळे, निवडणुकीत धन सापडले असले तरी त्यांचा “धनी’ मात्र शोधणे आव्हान बनले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.