रियाध – येणाऱ्या २०३० पर्यंत सौदी अरबचा पूर्ण कायापालट करण्याची तेथील युवराज मोहम्मद बीन सलमान यांची महत्वाकांक्षा आहे. तेलातून मिळणाऱ्या उत्पन्नावरचे अवलंबित्व त्यांना कमी करायचे आहे. त्याकरता त्या देशात विविध प्रकल्पांवर सध्या काम सुरू आहे. त्यातल्याच एका प्रकल्पाचे नाव आहे लाइन प्रोजेक्ट अथवा नियोम शहर. नव्याने वसवल्या जाणाऱ्या आणि संपूर्ण काचेच्या असणाऱ्या या शहराचे स्वप्न पूर्ण होणे सध्या अधांतरिच असल्याचे दिसते आहे. (Mohammed bin Salman vision 2030 for Saudi Arabia)
कसे असणार नियोम शहर –
सौदीच्या लाइन प्रकल्पा अंतर्गत १७० किलोमीटर लांब आणि २०० मीटर रूंद असे हे शहर वसवले जाणार आहे. हे शहर पूर्णपणे काचेच्या भिंतींनी झाकलेले असणार आहे. एखादा माणूस ज्याची कल्पना करू शकतो अशा सर्व सुविधा या शहरात असतील. येथे राहणाऱ्या १५ लाख लोकांना पूर्णत: रोबोट आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून सेवा दिल्या जातील. २०३० पर्यंत या पंधरा लाख लोकांना या शहरात आणायचे होते. मात्र ते आता धुसर दिसते आहे. कारण आतापर्यंत केवळ ३ लाख लोकांसाठीचीच योजना तयार झाली आहे. शिवाय शहराची लांबीही आता केवळ २.४ किलोमीटर करण्यात आली आहे.
दरम्यान, तज्ज्ञांनी यापूर्वीच या योजनेबाबत साशंकता व्यक्त केली होती. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार या प्रोजेक्टच्या एका माजी कर्मचाऱ्याने सांगितले की या शहराची संकल्पना वास्तवापासून फारच लांब आहे. योजनेला अनेक अपयशांनी घेरले असल्याचे ब्लूमबर्गने २०२२ मध्ये केलेल्या पाहणीत आढळून आले होते. त्यावर पुढील बाब म्हणजे सरकारने २०२४ मध्ये जे अंदाजपत्रक जाहीर केले आहे त्यात नियोम शहरासाठीच्या निधीची तरतूद करण्यात आलेली नाही.
सौदीच्या युवराजांच्या संकल्पनेनुसार या नव्या शहरात खोटा चंद्र, मोठ्या गगनचुंबी इमारती असणार होत्या. त्याकरता १५ मोठ्या प्रकल्पांसाठी गुंतवणूकही करण्यात आली होती. तथापि, तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या कल्पनेत जे शहर आहे तसे वसवण्याचे तंत्रज्ञानच आज वास्तवात नाही. तसेच सौदी अरबची तेलावरची निर्भरता इतक्यातच कमी होण्याची शक्यताही दृष्टीपथात नाही.