नवी दिल्ली – पंजाब नॅशनल बॅंक घोटाळ्यातील आरोपी आणि फरार व्यावसायिक मेहूल चोक्सी हा अँटिग्वा आणि बार्बुडा येथून बेपत्ता झाला आहे. ही बातमी झळकताच सीबीआयने त्याच्या शोध मोहिमेचा वेग वाढवला आहे. या घोटाळ्याचा सूत्रधार नीरव मोदी याचा मामा असणाऱ्या चोक्सीच्या ठावठिकाण्याबाबत सीबीआयने अँटिग्वा दूतावासाकडे तपशील मागितला आहे.
चोक्सी याच्या बेपत्ता होण्याची माहिती औपचारिक आणि अनौपचारिक पातळीवर सीबीआय पडताळून पाहात आहे. याशिवाय त्यांनी राजनैतिक सहकार्य मागितले आहे. इंटरपोलकडेही त्याच ठावठिकाणा शोधण्यासाठी मदत मागितली आहे. त्याच्या हस्तांतरणाबाबत औपचारिकता पूर्ण करण्यासाठी इंटरपोलचा अहवाल बंधनकारक असतो. त्याच्यावर इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी केल्यानंतर त्याला कोणत्याही देशाचे पोलीस अटक करू शकतात.
तत्पूर्वी, सकाळी कॅरेबियन बेट राष्ट्राच्या रॉयल पोलीस दलाने सांगितले की, अँटिग्वा आणि बार्बुडामध्ये चोक्सी 2018 पासून राहात होता. मात्र, सध्या तो बेपत्ता झाला आहे. चोक्सीचा शोध घेण्यासाठी व्यापक मोहीम राबवण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
बनावट हमीपत्राचा वापर करून पंजाब नॅशनल बॅंकेला 13 हजार 500 कोटी रुपयांचा गंडा चोक्सी आणि त्याचा भाचा नीरव मोदी यांनी घातला होता. मोदी सध्या लंडनच्या कारागृहात आहे. त्याने अनेकदा जामिनासाठी केलेला अर्ज फेटाळण्यात आला आहे. सध्या त्याला भारताकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
चोक्सीने भारतातून पलायन करण्यापूर्वी गुंतवणूक करणाऱ्याला नागरिकत्व या योजनेंतर्गत 2017 मध्ये अँटिग्वा आणि बार्बुडाचे नागरिकत्व मिळवले. त्यानंतर 2018 च्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तो भारतातून पळून गेला. मोदी आणि चोक्सी यांची सीबीआय चौकशी सुरू आहे.
वकिलांचा दुजोरा
दरम्यान, चोक्सी बेपत्ता असल्याचा दावा त्याच्या वकिलांनी केला आहे. अँटिग्वा पोलिसांच्या निवेदनात त्याला दुपारी सव्वा पाचच्या सुमारास अखेरचे पाहिले होते. त्यानंतर तो बेपत्ता झाला. त्याच ठावठिकाणा लागत नसल्याचे त्यात म्हटले आहे. मात्र आपण अँटिग्वा पोलीस आणि सीबीआय यांपैकी कोणाच्याही संपर्कात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.