नवी दिल्ली – दिल्ली पोलिसांनी आज मंगळावारी ट्विटरच्या ऑफिसवर नोटीस जारी केली आहे. ट्विटरने भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांच्या टूलकिट पोस्टवर ते बनावट असल्याचा शिक्का मारला आहे. केंद्र सरकारने इशारा दिल्यानंतरही त्यांनी तो शिक्का हटवलेला नाही. या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी ट्विटरला ही नोटीस जारी केली आहे.
त्यावर प्रतिक्रिया देताना कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी सत्याला डर नसतो, अशी प्रतिक्रिया दिली आहे. दिल्ली पोलिसांनी घाबरून ट्विटरच्या कार्यालयावर घातलेला छापा म्हणजे उघडकीला आलेला आपला बनावटपणा लपवण्याचा एक लाजीरवाणा प्रयत्न आहे, असे कॉंग्रेसनेही म्हटले आहे.
त्याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी टूलकिटचा हॅश टॅग वापरून सत्याला डर नसल्याचे म्हटले आहे. दिल्ली पोलिसांनी ट्विटरला नोटीस पाठवून तुम्ही कशाच्या आधारावर संबित पात्रा यांच्या पोस्टवर मॅन्युपुलेटेड मीडिया असा शिक्का मारला आहे, असा सवाल त्यांना विचारला आहे.
देशाची व पंतप्रधान मोदींची प्रतिमा खराब करण्यासाठी कॉंग्रेसने एक टूलकिट बनवल्याचा दाखला संबित पात्रा व अन्य केंद्रीय मंत्र्यांनी ट्विटरवरील पोस्टवर दिला होता व त्या अनुषंगाने त्यांनी काही कागदपत्रेही तेथे सादर केली होती. पण ती बनावट असल्याचे उघडकीला आल्याने भाजप नेत्यांची गोची झाली आहे.