वॉशिंगटन -अमेरिकन कॉंग्रेसच्या कॉकसच्या बैठकीत चर्चा झाल्याप्रमाणे संसद सदस्यांनी संसदेचे अध्यक्ष केविन मॅकार्थी यांना विनंती केली आहे की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या अमेरिका दौऱ्यात संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करण्यासाठी आमंत्रित केले जावे. मोदींचे कॉंग्रेसमधील भाषण भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध मजबूत करण्यासाठी चांगले सिद्ध होईल.
डेमोक्रॅटिक पक्षाचे कॉंग्रेस सदस्य रो खन्ना यांनी मॅकार्थी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, अध्यक्ष जो बायडेन 22 जून रोजी पंतप्रधान मोदींची भेट आणि डिनरचे आयोजन करतील.
भारतीय वंशाचे कॉंग्रेस सदस्य, रिपब्लिकन पक्षाचे कॉंग्रेस सदस्य मायकल वॉल्ट्ज यांनीही म्हटले आहे की, संसदेच्या संयुक्त अधिवेशनात पंतप्रधान मोदींचे भाषण दोन्ही देशांमधील संबंध मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीच्या नेत्याने संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करणे हा सन्मान असेल. तसेच यामुळे भारत-अमेरिका संबंध मजबूत होतीलच, शिवाय हा चीनला कडक संदेशही ठरेल.
मे महिन्याच्या सुरुवातीला रो खन्ना आणि मायकल वॉल्ट्ज या दोन्ही खासदारांनी भारत-अमेरिका शिखर परिषदेचे आयोजन केले होते, ज्यामध्ये देशभरातील नेते व तज्ञ उपस्थित होते. अध्यक्ष बायडेन आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील काही बैठकांमुळे दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये लवचिकता आली आहे, असे दोन्ही कॉंग्रेसजनांनी लिहिले आहे. सर्वांसाठी शांतता आणि समृद्धीचा प्रचार करत असतानाच आम्ही दोघांच्या व्यापार, गुंतवणूक आणि कनेक्टिव्हिटीला चालना देऊ आणि दोन्ही देशांमध्ये अधिक सखोल संबंध प्रस्थापित होऊ शकतील, असे खन्ना आणि वॉल्ट्ज यांनी सांगितले.