लोणावळा – महाराष्ट्राच्या अध्यात्मिक क्षेत्रात अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या इंद्रायणी नदीची सध्याची विटलेली अवस्था बघून मन हेलावून जाते. ही देवनदी “अरे कोणीतरी काही करा रे.. श्वास, कोंडतोय माझा” अशी साद घालत असल्याचा पदोपदी भास होतो आहे. लोणावळ्यातील उगम स्थानापासूनच ही नदी प्रदुषित होत आहे.
इंद्रायणी नदी महाराष्ट्राच्या अध्यात्मिक क्षेत्रात अत्यंत पवित्र मानली गेली आहे. संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज यांची कारकीर्द ज्या आळंदी आणि देहू गावात घडली. ती दोन्ही गावे इंद्रायणी नदीच्या तीरावर बसलेली आहेत. हीच इंद्रायणी नदी ज्या भीमा नदीमध्ये जाऊन विलीन होते त्या भीमेच्या काठावरच पुढे श्रीक्षेत्र पंढरपूर वसलेले आहे. अशा या पवित्र नदीची लोणावळा शहरातील दुरावस्था बघितल्यास याच नदीला देवनदी म्हणून संबोधले जाते का? असा प्रश्न पडतो. या नद्या निसर्गचक्रात एकप्रकारे रक्तवाहिन्यांसारखे काम करत असतात. पण शहरातून वाहणाऱ्या या नदीची सद्याची परिस्थिती पाहिली असता पुढील काळात कोणत्या भीषण समस्येला तोंड द्यावे लागणार याची कल्पनाच करवत नाही.
स्वच्छतेच्या बाबत संपूर्ण देशात प्रथम क्रमांकाच्या शर्यतीत असलेल्या लोणावळा शहराला इंद्रायणी नदीची दुरावस्था एक डोकेदुखी बनून राहिलेली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी चार वर्षांपूर्वी गुजरात येथे अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले होते. अहमदाबादमधील साबरमती नदीचा कसा कायापालट केला त्याच धर्तीवर लोणावळ्यातील इंद्रायणी नदीचा कायापालट करण्यात येणार होता. मात्र त्याचवेळी आलेल्या करोना संकटाने सर्व काही जाग्यावरच थांबले गेले.
कुरवंडे गावात इंद्रायणीचा उगम
इंद्रायणी नदीचा उगम लोणावळा नगरपरिषद हद्दीजवळील कुरवंडे येथील डोंगरामध्ये आहे. उगम ते वलवण हद्द अशी चार कि.मी. नदीची लांबी आहे. पावसाळ्यातच नदीला पाण्याचा प्रवाह असतो. लोणावळा शहरात इंद्रायणी नदी तीराचे आजूबाजूस रहिवासी वस्ती आहे. नदीमध्ये ठिकठिकाणी नाले जोडलेले आहेत. नाल्यांमधून येणारे सांडपाणी नदी पात्रात मिसळले जाते. पावसाळा वगळता नदीचे शहरातील पात्र जास्तीत जास्त काळ जलपर्णी खाली झाकलं गेलेलं असत.
आवश्यक उपाययोजना
नदीपात्राचे रुंदीकरण आणि मोजणी करणे आवश्यक
नदीपात्रातील वर्षानुवर्षे साचलेला गाळ काढणे
पुरनियंत्रणासाठी नदीपात्रालगत संरक्षक भिंत बांधणे
नाल्यातून येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करणे
वृक्ष लागवड तसेच नदी सुधार प्रकल्प राबविणे