नवी दिल्ली – जन मन सर्व्हेसाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी देशाच्या प्रगतीविषयी जनतेकडून मत मागवले आहे. आगामी लोकसभा निवडणूक जवळ येऊन ठेपली आहे.
त्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान मोदींच्या नमो ॲपवरून मागील महिन्यात सर्वेक्षण हाती घेण्यात आले. मोदी सरकार आणि खासदारांच्या कामगिरीविषयी जनतेचा मूड जाणून घेणे हा त्या सर्वेक्षणाचा उद्देश आहे.
आता त्याही पुढे जाऊन मोदी देशाच्या प्रगतीविषयी जनतेला काय वाटते ते जाणून घेण्यास उत्सुक असल्याचे सोमवारी सूचित झाले. त्यांनी सोमवारी सोशल मीडियावरून जनतेला आवाहन केले. मागील १० वर्षांत देशाने विविध क्षेत्रांत केलेल्या प्रगतीविषयी तुम्हाला काय वाटते?
जन मन सर्व्हेच्या माध्यमातून तुमची प्रतिक्रिया नमो ॲपवर थेट माझ्याशी शेअर करा, असे त्यांनी म्हटले. आता मोदींच्या आवाहनाला जनता कसा प्रतिसाद देणार ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. जनतेच्या प्रतिसादाकडे सत्ताधाऱ्यांप्रमाणेच विरोधकांचेही लक्ष असेल.