नवी दिल्ली – सीबीआयच्या छापासत्राचा खुबीने राजकीय वापर करून आपने स्वत:ला थेट भाजपचा प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून प्रोजेक्ट केले. देशात 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी विरूद्ध दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल असा सामना रंगेल, असा दावा आपकडून करण्यात आला.
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या निवासस्थानावर सीबीआयने शुक्रवारी छापा टाकला. त्यानंतर आपचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय सिंह यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये बोलताना ते म्हणाले, केजरीवाल आणि त्यांच्या प्रशासनाच्या मॉडेलची लोकप्रियता देशभरात वाढत आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी आणि भाजपची धास्ती वाढली आहे. ती बाब सीबीआयच्या छाप्यातून सिद्ध होते. छाप्यानंतर भाजप नेत्यांनी केजरीवाल यांच्यावर टीकेचे सत्र सुरू केले. त्यातून पुढील लोकसभा निवडणुकीत प्रमुख लढत आपशी असल्याचा संदेश भाजपकडूनच दिला जात आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
गुजरातमध्ये जाऊन केजरीवाल तिथे दिल्ली आणि पंजाब मॉडेल राबवण्याची ग्वाही देत आहेत. त्यामुळे अस्वस्थ झालेले मोदी आक्रमक होऊन जनतेला उपलब्ध केल्या जाऊ शकणाऱ्या मोफत सुविधांना मोफत रेवड्या म्हणून हिणवू लागले. त्यावर मोदींनीच प्रचंड कर्जे माफ करून त्यांच्या उद्योगपती मित्रांना मोफत रेवड्या वाटल्याचे केजरीवाल यांनी समोर आणले.
त्यानंतर मोदींनी आपच्या नेत्यांमागे सीबीआय आणि ईडीचा ससेमिरा लावला, असा आरोप सिंह यांनी केला. बदनाम करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी आप लढत राहील. केजरीवाल आणि त्यांच्या मॉडेलला मोदी रोखू शकणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.