मुंबई – राज्यभरात शुक्रवारी मोठ्या उत्साहात दहीहंडी उत्सव साजरा झाला. त्या उत्सवामुळे मुंबईत तर जणू जल्लोषी वातावरण होते. दहीहंडी फोडण्यासाठी थर रचण्याच्या प्रयत्नांत गोविंदा खाली कोसळण्याच्या घटना राज्याच्या विविध भागांत घडल्या. मुंबईत घडलेल्या तशाप्रकारच्या घटनांत 111 गोविंदा जखमी झाले. त्यातील डझनभर गोविंदांवर विविध रूग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
किरकोळ जखमी झालेल्या इतरांना उपचारांनंतर डिस्चार्ज देण्यात आला. सरकारी रूग्णालयांना जखमी गोविंदांवर मोफत उपचार करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. सरकारने दहीहंडीला खेळाचा दर्जा दिला आहे. त्याशिवाय, गोविंदांच्या हितासाठी विविध घोषणाही केल्या आहेत. सरकारचे ते निर्णय यंदा गोविंदांच्या उत्साहात भर घालणारे ठरले.