नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी अर्थव्यवस्थेची घसरण, चिनी कुरापती या मुद्द्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घेरण्याचा प्रयत्न केला. मोदी मौन का बाळगून आहेत? अर्थव्यवस्था, चीनबाबत ते काहीच बोललेले नाहीत. त्यांनी काहीतरी बोलावे अशी जनतेची अपेक्षा आहे, असे राहुल यांनी म्हटले.
देशातील तरूणांना रोजगार मिळावा या मागणीसाठी कॉंग्रेसने स्पिक अप फॉर जॉब्ज या नावाने सोशल मीडियावरून अभियान राबवले. त्याचाच भाग म्हणून राहुल यांनी एक व्हिडीओ जारी केला. त्यातून त्यांनी मोदी आणि त्यांच्या सरकारला विविध मुद्द्यांवरून लक्ष्य केले.
गरिबांच्या थेट बॅंक खात्यांमध्ये पैसे जमा केले जावेत. लहान आणि मध्यम उद्योगांचे रक्षण केले जावे आणि खासगीकरण थांबवावे, अशी त्रिसुत्रीही राहुल यांनी सरकारपुढे मांडली. त्याशिवाय, एक ट्विट करत त्यांनी मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे कोट्यवधी लोकांच्या नोकऱ्या गेल्याचा आणि जीडीपीमध्ये ऐतिहासिक घसरण झाल्याचा आरोप केला.
सरकारने देशातील तरूणांचे भविष्य चिरडून टाकले आहे. तरूणांचा आवाज आपण सरकारपर्यंत पोहचवू, असेही राहुल यांनी पुढे म्हटले.