रघुवंश प्रसाद सिंह यांची राजदला सोडचिठ्ठी

पाटणा – बिहार विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना बिहारमधील प्रमुख विरोधीपक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री रघुवंश प्रसाद सिंह यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. सिंह यांच्या निकटवर्तीयांच्या सूत्रांनी ही माहिती दिली. रघुवंश प्रसाद सिंह यांनी राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना लिहिलेल्या पत्रामध्ये सिंह यांनी आपण पक्ष सोडत असल्याचे म्हटले आहे. 

‘जननायक कर्पूरी ठाकूर यांच्या निधनानंतर आपण गेली 32 वर्षे तुमच्या (लालूंच्या) पाठीमागे उभे राहिलो होतो. मात्र, आता नाही,’ असे रघुवंश प्रसाद सिंह यांनी लिहिलेल्या छोट्या पत्रात म्हटले आहे. चारा गैरव्यवहार प्रकरणी रांचीच्या तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या लालूप्रसाद यादव यांना पाठवलेल्या या पत्रात एका वाक्‍यात पक्षाचा राजीनामा दिला आहे.

पत्राच्या शेवटी रघुवंश प्रसाद सिंह यांनी आपल्याला पक्षाचे नेते, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांकडून प्रेम मिळाले. कृपया आपल्याला क्षमा करावी, असेही म्हटले आहे. रघुवंश प्रसाद सिंह यांना कोविड पश्‍चातच्या गुंतागुंतीमुळे दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांनी जून महिन्यातच आपल्या राजीनाम्याची घोषणा केली होती. मात्र त्यावेळी लालूप्रसाद यादव यांनी त्यांना रोखले होते. 

रघुवंश प्रसाद यांनी मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये ग्रामीण विकासासह अनेक खात्यांचे मंत्रिपद सांभाळले होते. कथित गुंड आणि लोकजनशक्‍ती पार्टीचे लोकसभेतील वैशाली येथील माजी खासदार रामा सिंह यांना राजदमध्ये प्रवेश देण्यावर ते नाराज होते. लालूप्रसाद यादव यांचे वारसदार आणि बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्या कार्यपद्धतीवरही ते नाराज होते, असे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.