‘मोदी सरकारने सीएए लागू केल्याने महात्मा गांधीजींची इच्छा पूर्ण’

नवी दिल्ली – संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाचा प्रारंभ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने झाला. मोदी सरकारने नागरिकत्व कायदा आणून राष्ट्रपिता महात्मा गांधींची इच्छा पूर्ण केली आहे, असेही रामनाथ कोविंद यांनी म्हंटले आहे. यावेळी विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात सरकारतर्फे केल्या जाणाऱ्या कामांची माहिती दिली. फाळणीनंतर महात्मा गांधी यांनी सांगितलं होतं की, पाकिस्तानमधील हिंदू आणि शीख ज्यांना तेथे राहण्याची इच्छा नाही ते भारतात येऊ शकतात. त्यांना सामान्य जीवन उपलब्ध करुन देणं भारत सरकारचं कर्तव्य आहे. महात्मा गांधींच्या विचारांचं समर्थन करत प्रत्येक वेळी राष्ट्रीय नेते आणि राजकीय पक्षांनी त्यांना पुढे नेलं आहे. आपल्या राष्ट्राची निर्मिती करणाऱ्यांच्या इच्छेचा सन्मान करणं आपलं दायित्व आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांद्वारे नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू करून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची इच्छा पूर्ण झाली याचा मला आनंद आहे. या सरकारने सीएए कायदा आणून दुसऱ्या देशात अपमानित जीवन जगणाऱ्या हिंदुना भारतीय नागरिकत्व देणार आहे, तसेच देशातील घुसखोरांना देशाबाहेर काढण्यात येणार आहे, असे राष्ट्रपतींनी म्हंटले आहे. सीएएचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अभिभाषणात उल्लेख करताच सभागृहात विरोधी पक्षाने गदारोळ केला. तसेच रामनाथ कोविंद यांनी यावेळी जम्मू काश्मीरमधून ३७० कलम हटवण्याचा निर्णय ऐतिहासिक पाऊल असल्याचा उल्लेख करत केंद्र सरकारच्या निर्णयाचं कौतुक केले.

दरम्यान, 1 फेब्रुवारीला सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष असेल. दोन टप्प्यांत अधिवेशनाचे कामकाज चालणार आहे. पहिल्या टप्प्याचे कामकाज 11 फेब्रुवारीपर्यंत चालेल. त्यानंतर 2 मार्च ते 3 एप्रिल या कालावधीत अधिवेशनाचा दुसरा टप्पा पार पडेल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.