नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी ते पद सर्वांधिक काळ भुषवणारे कॉंग्रेसेतर पक्षाचे नेते ठरले आहेत. तो बहुमान मिळवताना मोदी यांनी माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांचा विक्रम मोडला.
पंतप्रधान म्हणून वाजपेयी यांना 2 हजार 268 दिवसांचा कार्यकाळ लाभला.
मोदी यांच्या कार्यकाळाने गुरूवारी तो कालावधी मागे टाकला. त्यामुळे वाजपेयी यांच्या रूपाने भाजप नेत्याने प्रस्थापित केलेला विक्रम त्याच पक्षाच्या दुसऱ्या नेत्याने (मोदी) मोडण्याची किमया घडली. मोदी आता सर्वांधिक काळ पंतप्रधानपद भुषवणाऱ्यांच्या यादीत चौथ्या स्थानावर पोहचले आहेत.
पहिल्या तीन स्थानांवर अनुक्रमे पं.जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि मनमोहन सिंग या कॉंग्रेस नेत्यांचे नाव कोरले गेले आहे. देशाचे पहिले पंतप्रधान नेहरू तब्बल 16 वर्षे 286 दिवस त्या पदावर होते. त्यांच्या कन्या इंदिरा यांना पंतप्रधान म्हणून 15 वर्षे 350 दिवसांचा कार्यकाळ लाभला. मनमोहन 10 वर्षे 4 दिवस पंतप्रधानपदावर राहिले.