पुणे – मेडिकल दुकनात घुसून पिता-पुत्रांना कोयत्याचा धाक दाखवून 68 हजार रुपयांची जबरी चोरी करणाऱ्या टोळीप्रमुखासह तिघांना मोक्का न्यायालयाने 7 वर्षे सक्तमजुरी आणि 10 लाख 25 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. मोक्काचे विशेष न्यायाधीश एस.आर.नावंदर यांनी हा आदेश दिला आहे. दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. गुन्ह्यातील हत्याराची जप्ती, फिर्यादीची साक्ष, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. याचा विचार करून त्याला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी मोक्काचे विशेष सरकारी वकील विजय फरगडे यांनी केली.
टोळीप्रमुख अमर ऊर्फ रिंकू चौहान, बिटू ऊर्फ मनप्रित सुखदेवसिंग माही आणि दिलीप कुलवंतसिंग इंद्रजितसिंग चौहान अशी शिक्षा झालेल्या तिघांची नावे आहेत. पिंपरी येथील नेहरूनगर येथील एका मेडिकल दुकानात 20 ऑक्टोबर 2015 रोजी हा प्रकार घडला. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे मोक्काचे विशेष सरकारे वकील विजय फरगडे यांनी तेरा साक्षीदार तपासले. तिघे आरोपी मेडिकल दुकानाच्या समोर राहत असून, एकामेकांचे नातेवाईक आहेत. मेडिकल दुकानदाराने याबाबत पोलिसात फिर्याद दिली आहे. घटनेच्या वेळी फिर्यादी आणि त्याचे वडिल दुकानात होते.
अमर दुकानाच्या काऊंटरजवळ गेला. गोव्याला जाण्यासाठी आणि न्यायालयात भरण्यासाठी पैशाची मागणी केली. पैसे नसल्याचे फिर्यादींनी सांगितले. त्यावेळी कमरेचा कोयता काढून तो शिवीगाळ करू लागला. दरम्यान बिटू आणि दिलीपही तेथे गेले. त्यावेळी अमर आणि बिटू दुकानात घुसले. पैसे न दिल्यास वार करण्याची धमकी देत फिर्यादीच्या खिशातील 12 हजार रुपये आणि गल्ल्यातील 56 असे एकुण 68 हजार रुपये लांबविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यांच्यावर 2006 ते 2015 या काळात 27 गुन्हे दाखल असून, टोळीने गुन्हे करत असल्याने मोक्का लावण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.