नवी दिल्ली – दिल्लीतील मद्य घोटाळा प्रकरणात ईडीने आज आणखी एकाला अटक केली आहे. चनप्रित सिंग असे त्यांचे नाव असून गोवा विधानसभा निवडणुकीच्या वेळी आम आदमी पार्टीच्या निधीचे (पैशांचे) व्यवस्थापन त्यानेच केले होते, असा आरोप आहे.
पक्षाचे दिल्लीतील आमदार दुर्गेश पाठक यांचीही अलिकडेच या घोटाळ्याच्या प्रकरणात ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. आतापर्यंत १६ जणांना अटक झाली होती, आजची अटक ही १७ वी असल्याचे सांगण्यात आले.
चनप्रित सिंगला या अगोदर याच प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयकडून अटक करण्यात आली होती. २०२२ मध्ये झालेल्या गोवा विधानसभा निवडणुकीच्या वेळी तेथे प्रचाराला जाणाऱ्या नेते, कार्यकर्ते आणि अन्य व्यक्तींच्या खर्चाच्या रकमेचे व्यवस्थापन वगैरे बाबी सगळ्या चनप्रित सिंग यानेच हाताळल्या होत्या अशी माहिती ईडीकडून न्यायालयात देण्यात आली. दक्षिणेकडील साऊथ ग्रुपने आम आदमी पार्टीला १०० कोटी रूपये दिले होते असा आरोप ईडीने अगोदरच केला आहे.
या साऊथ ग्रुपमध्ये तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या के. कविता आणि व्यावसायिक शरद रेड्डी यांच्यासह अन्य काही जणांचा समावेश आहे. आपला जे १०० कोटी रूपये देण्यात आले होते त्यातील ४५ कोटी रूपयांचा वापर त्यांनी गोवा विधानसभा निवडणुकीसाठी केला असेही ईडीने म्हटले आहे.