अध्यक्ष राज ठाकरे यांचा पुण्यात तीन दिवस ठिय्या
पुणे जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधींची घेणार बैठक
पुणे – लोकसभेत मनसेने आपले इंजिन चालवले नाही; परंतु “लाव रे तो व्हिडिओ’ हा डायलॉग मात्र फेमस केला. आता त्यांनी विधानसभेच्या निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीला सुरूवात केली असून, पुणे शहर, जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्र येथील प्रमुख पदाधिकाऱ्यांची आणि शाखा प्रमुखांची बैठक मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात बोलावली आहे. भोसले नगर येथील अशोक सोसायटीच्या हॉलमध्ये ही बैठक होणार आहे.
लोकसभेच्या निवडणुकांवेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यभर सभा घेतल्या. त्यामध्ये त्यांनी भाजप विरोधी प्रचार केला. भाजप सरकारची निष्क्रीयता आणि त्यांनी दिलेली आश्वासने किती फोल आहेत, असे सांगत त्यांनी पुरावे सादर करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा उपयोग विरोधी बाकावर बसणाऱ्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी किंवा अन्य पक्षांना झाला नाही. उलट त्यांचे मताधिक्य कमी झाले आणि उलट भाजप सरकार मागीलवेळेपेक्षा जास्त जागा घेऊन पूर्णपणे बहुमतात आले.
ठाकरे यांनी ठिकठिकाणी सभा घेत भाजपविरोधी प्रचार केला त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ठाकरे यांना विधानसभेच्या जागा “प्रॉमिस’ केल्याचे बोलले जात होते. किंबहुना असा आरोप भाजपने केला होता. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मध्ये मनसेला विलास सोनवणे यांची जागा सोडली तर काहीच कामगिरी करता आली नाही. आता विधानसभेसाठी तीन-चार महिन्यांचा कालावधी राहिला आहे. त्यामुळे यंदा त्यांनी ही बाब गांभीर्याने घेतली असून, व्यूहरचना करण्यासाठी पुणे, जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रतिनिधींना बोलावले आहे. तीनही दिवस ते प्रत्येक वॉर्डनिहाय शाखा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्याशी चर्चा करणार आहेत, त्यांचे मत, अडचणी जाणून पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.