पुणे – राज्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या शिक्षण संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार दिनकर पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. पाटील यांनी सूत्रे स्वीकारुन कामकाज सुरू करताच कामचुकार अधिकारी, कर्मचारी यांचे धाबे दणाणले आहे. पाटील यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन झाडाझाडती घेतली. गंगाधर म्हमाणे हे नियत वयोमानानुसार शुक्रवारी (दि.31) सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे शिक्षण संचालक पदाचा कार्यभार अल्पसंख्यांक व प्रौढ शिक्षण संचालनालयाचे संचालक पाटील यांच्याकडे देण्याबाबतचे आदेश शासनाने जारी केले होते. त्यानुसार पाटील यांनी कार्यभार स्वीकारला. शिस्तप्रिय व कर्तव्यदक्ष अधिकारी अशी पाटील यांची प्रतिमा आहे. शनिवारी सकाळी 10 वा.पाटील कार्यालयात उपस्थित झाले. यामुळे अनेकांची धांदल उडाली. त्यांनी कार्यालयातील प्रमुख अधिकाऱ्यांची एक तास बैठक घेऊन कामकाजाचा आढावाही घेतला.
प्रत्येक अधिकाऱ्यांने आपआपल्या विभागातील दाखल झालेली विविध प्रकरणे, प्रलंबित पडलेली प्रकरणे, मार्गी लावलेली प्रकरणे याची माहिती लेखी स्वरुपात सादर करावी. फायलींच्या नोंदीचे रजिस्टर अपडेट ठेवावे. प्रकरणांच्या फायली व्यवस्थितपणे तयार करुनच सादर कराव्यात. पारदर्शकपणे काम करावे. प्रकरणे प्रलंबित राहू नयेत याची प्रत्येकाने खबरदारी बाळगावी. याबाबतच्या महत्वाच्या सूचना पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. कार्यालयातील टापटीपपणाला त्यांनी प्राधान्य दिले आहेत. शाळांचे प्रतिनिधी, संस्थांचे व संघटनांचे पदाधिकारी यांची कार्यालयात सतत गर्दी होऊ नये यासाठीच योग्य त्या उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. कागदपत्रांची परिपूर्ण पूर्तता असणाऱ्या फायली तात्काळ निकाली काढण्याचे नियोजनही करण्यात येणार आहे.
नियमावलीची अंमलबजावणी करावीच लागणार
गेल्या काही वर्षांमध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाची घडी विस्कटलेली आहे. काही अधिकारी, कर्मचारी कधीही येतात व कधीही जातात. प्रकरणे प्रलंबित पडल्याच्या प्रमाणात खूप वाढ झाली आहे. यामुळे कार्यालयात नेहमीच गर्दी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत होते. फायली निकाली लावण्यासाठी वारंवार हेलपाटे मारण्याची वेळ यायची. आता मात्र या कारभारात सुधारणा करावीच लागणार आहे. अन्यथा कारवाईला सामोर जावे लागेल, अशी भीती अधिकारी, कर्मचाऱ्यांकडूनच व्यक्त करण्यात येऊ लागली आहे.