पोंगयोंग- अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतची बैठक निष्फळ ठरल्यामुळे उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनने राजदुतासह पाच जणांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली. व्हिएतनामची राजधानी हनोईमध्ये ट्रम्प आणि किम जोंग यांच्यात बैठक झाली होती. पण यात कोणताही तोडगा निघाला नाही. म्हणून या बैठकीचे नियोजन करणाऱ्या राजदुतासह इतर चार अधिकाऱ्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली.
दक्षिण कोरियातील एका वृत्तपत्रात याबाबत माहिती देण्यात आली आहे. हयोक चोल यांना अमेरिकेसोबत संबंध सुधारण्यासाठी विशेष राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आले होते. हनोईच्या बैठकीची रुपरेषा ठरवण्याची जबाबदारीही चोल यांच्याकडेच होती. शिवाय किम जोंगसोबत चोल हे हनोईला विशेष ट्रेनने गेले होते.
तपासानंतर किम जोंगसोबत विश्वासघात केल्याचा ठपका ठेवत चोल यांना मार्च मार्चमध्ये मीरिम विमानतळावर परराष्ट्र मंत्रालयाच्या चार वरिष्ठ अधिकाऱ्यांसह गोळ्या घालण्यात आल्या. या चार अधिकाऱ्यांची नावे गुप्त ठेवण्यात आली.
या वृत्तातील आणखी एका दाव्याप्रमाणे, समिटमध्ये भाषांतराची चूक झाल्यामुळे किम जोंग उनची महिला भाषांतरकार शिन हे यांग यांना तुरुंगात टाकण्यात आले होते. ट्रम्प यांनी “नो डील’ ही घोषणा केली तेव्हा शिन यांना किमचा नवा प्रस्ताव अनुवादित करता आला नव्हता.