राजगुरूनगर (पुणे) – खेड तालुक्यातील घरगुती, शेतीपंपाचे मीटर रीडिंग न घेता अवास्तव वीज बिल देण्यात आल्याचा आरोप करून त्याची दखल न घेतल्यावरून वीज वितरण कंपनीच्या चांडोली येथील उपविभागीय कार्यालयात खेड तालुका मनसेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी (दि. 9) उपकार्यकारी अभियंता मनिष कडू यांच्या समक्ष त्यांच्या कार्यालयाची तोडफोड केली.
अवास्तव वीजबिल नागरिकांना योग्य दरात व रकमेचे करून मिळावे, बिलांची तातडीने दुरुस्ती करावी, प्रत्येक महिन्याचे रीडिंगनुसार बिल मिळावे, अशी मनसेची मागणी होती. त्यासाठी चार दिवसांची मुदत देणारे निवेदन मनसेचे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (दि. 4) उपकार्यकारी अभियंता मनीष कडू यांना देण्यात आले होते. त्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने बुधवारी (दि. 9) सकाळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी खळ्ळ्खट्याक आंदोलन केले. अधिकारी कडू त्यांच्या कार्यालयात असताना त्यांना कार्यकर्त्यांनी विचारणा केली. लागोपाठ काचा फोडून खुर्च्या फेकण्यात आल्या. मनीष कडू यांनी खेड पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलीस निरीक्षक सतीश गुरव, सहायक निरीक्षक निलेश बडाख, पोलीस हवालदार विक्रम तापकीर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.