पुणे – शहरासह राज्य आणि देशावर करोनाचे संकट उभे आहे. संपूर्ण देश आज भीतीच्या छायेखाली असताना, बाधितांना बरे करण्यासाठी आरोग्य यंत्रण झटत आहे. त्याचवेळी मेंदूमृत व्यक्तीचे अवयव गरजूंना मिळावेत, त्यांना जीवनदान मिळावे यासाठी खटाटोप सुरू आहे. त्यामध्ये रुग्णालये एकजुटीने काम करत असून, त्यातूनच करोना काळातील 10 वे अवयव प्रत्यारोपण रविवारी यशस्वी करण्यात आले.
मेंदूतील अंतर्गत रक्तस्त्रावानंतर 41 वर्षीय महिलेला जहांगिर रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचाराला प्रतिसाद न दिल्यामुळे डॉक्टरांनी तिला मेंदूमृत घोषित केले. दरम्यान महिलेचा पती आणि इतर कुटुंबियांनी तिचे अवयव दान करण्याची तयारी दर्शवल्यामुळे मुंबईतील गरजू रुग्णासाठी महिलेचे हृदय रवाना करण्यात आले.
पुणे आणि मुंबईतील वाहतूक पोलिसांनी “ग्रीन कॉरिडॉर’ केल्यामुळे हे हृदय योग्यवेळी गरजू रुग्णापर्यंत पोहोचवणे शक्य झाले. यकृताचे प्रत्यारोपण दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेणाऱ्या गरजू रुग्णावर करण्यात आले. पुणे विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीच्या आरती गोखले यांनी माहिती दिली.