पुणे – राज्य शासनाच्या मान्यतेनंतर तब्बल साडेतीन महिन्यांनंतर सलून व ब्यूटी पार्लरची दुकाने उघडली. मात्र, पहिल्याच दिवशी ग्राहकांकडून याला संमिश्र प्रतिसाद मिळाला.
लॉकडाऊन काळात खबरदारी म्हणून सलून व ब्युटी पार्लर मार्चपासून बंद ठेवली होती. दुकाने बंद असल्याने संबंधित दुकानदारांची आर्थिक अडचणी निर्माण झाली. दुकाने सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी नाभिक व्यावसायिकांनी शासनाकडे केली होती. शहरात प्रतिबंधित क्षेत्राबाहेर सलून व ब्यूटी पार्लरची दुकाने उघडण्यास परवानगी देत महापालिकेने नियमावलीही निश्चित केली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून दुकानदारांनी साफसफाईची कामे पूर्ण करून घेतली. त्यानंतर युज अँड थ्रोचे टॉवेल, ऍप्रोन, मास्क, ग्लोव्होज, स्प्रे, फेस पॅक, सॅनिटायझर यांची खरेदी करून त्याची दुकानात व्यवस्था करावी लागली. सकाळी अपॉईन्मेंट घेऊनच सलून सेवा सुरू करण्यात आली. दुकानात एकावेळी एकाच ग्राहकाला येता यावे यासाठी खुर्चीच्या व्यवस्थेत बदलही करावे लागले. आधी कटींगसाठी पंधरा मिनिटे लागत होती. आता अर्धातास लागत आहे. कटींग झाल्यानंतर कात्री, वस्तरा, कंगवा सॅनिटाईज करून घेण्याची सवयही दुकानदारांनी लावून घेतली आहे.
मागण्या मान्य केल्यानंतरच सलून उघडणार
सलून व्यावसायिकांना 50 लाखांचे विमा कवच लागू करावे, दुकान भाडे व वीजबिल माफ करावे, आर्थिक मदत जाहीर करावी आदींसह विविध मागण्या राज्य शासनाकडे केल्या आहेत. मात्र, शासनाने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे राज्यातील बहुसंख्य सलून दुकाने बंदच ठेवली आहे. शासनाच्या अटी व शर्तीचे पालन करून दुकाने चालविण्यासाठी खूप खर्च करावा लागणार आहे. तो सर्वच दुकानदारांना करता येणे शक्य होणार नाही. शासनाने मागण्या मान्य केल्यानंतरच सर्व दुकाने उघडण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र सलून व पार्लर असोसिएशनचे अध्यक्ष व नाभिक समाज नेते सोमनाथ काशिद यांनी दिली.