सातारा (प्रतिनिधी) – आर्थिक मंदी, स्पर्धा आणि बेरोजगारीच्या काळात तीन होतकरु युवकांनी एकत्रित येत रोवलेला नवीन उद्योगाचा पाया आदर्शवत आणि अभिमानास्पद आहे. युवकांनी जिद्द, चिकाटी, प्रामाणिकपणा आणि कष्टाच्या जोरावर स्वत:च्या पायावर उभे राहणे काळाची गरज आहे. त्यातूनच निर्माण झालेली जे. एम. एन्टरप्रायजेस संस्था अल्पावधीत नावलौकिक मिळवेल, असा विश्वास आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला.
स्वप्नील जाधवराव, जगतनारायण दुबे आणि दिनेश गायकवाड या तीन सुशिक्षित मित्रांनी धाडसी पाऊल उचलत जे. एम. एन्टरप्रायजेसच्या रुपाने व्यवसायात पदार्पण केले. या कंपनीच्या माहितीपत्रकाचे अनावरण शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी ज्ञानदेव रांजणे, राजेंद्र जाधव, महेंद्र जाधव, जितेंद्र जाधव, विश्वजित बर्गे, राहुल तांबोळी, जितेंद्र वारागडे, अभिजित जाधव, अनमोल जाधव, अजय माळवदे, गणेश बगाडे, सनी कांबळे आदी उपस्थित होते. कनिष्ठ ते वरिष्ठ पदावरील कुशल, अकुशल कामगार पुरवठा, हाऊसकिपिंग, कारखाने, व्यावसायिक संकुल, दवाखाने, शाळा, शासकीय, निमशासकीय कार्यालये, शॉपिंग मॉल आदी वास्तूंमध्ये सफाई, निर्जंतुकीकरण अशी कार्ये मशीन आणि कुशल कामगारांमार्फत करणे, विविध प्रकारच्या आर्थिक संस्था, व्यवसायांना सुरक्षा रक्षक पुरवणे, रुग्णांसाठी काळजीवाहू कर्मचारी, अत्यावश्यक सेवा, परिचारिका, परिचारक तसेच स्वच्छता यासारख्या वैद्यकीय सेवा पुरवणे, औद्योगिक क्षेत्रातील बांधकामे, इमारतींचे रंगकाम तसेच कोणत्याही पध्दतीचे बांधकाम करणे आदी सेवा जे. एम. एन्टरप्रायजेसमार्फत दिल्या जाणार आहेत.
या व्यवसायाच्या माध्यमातून तिन्ही युवकांद्वारे लोकांना चांगली दर्जेदार सेवा मिळेल यात शंका नाही, अशा शब्दांत शिवेंद्रसिंहराजे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.