पुणे (गणेश आंग्रे) – हस्तलिखित सात-बारा उताऱ्यांवरील क्षेत्र आणि डिजिटल सात-बारा उताऱ्यांवरील क्षेत्रात तफावत, सात-बारा उताऱ्यावरील नावांमध्ये चुका अशा त्रुटी असलेल्या सात-बारा उताऱ्यांची संख्या जिल्ह्यात 7 हजार 523 आहे. डिजिटल सात-बारा उताऱ्यांमधील तलाठ्यांच्या चुकांचा त्रास मात्र नागरिकांना सहन करावा लागत आहे. मागील दोन -तीन वर्षांपासून पाठपुरावा करूनही तहसीलदारांकडून चूक दुरुस्तीचे आदेश होत नाहीत, असा अनुभव नागरिकांना येत आहे. या चुकांची दुरुस्ती करण्यासाठी शेतकऱ्यांना तहसील कार्यालयाचे उंबरे झिजवावे लागत आहेत.
सात-बारा उतारा हा जमीनविषयक मालमत्तेचा महत्त्वाचा पुरावा आहे. जमिनीचा मालक कोण आहे, हे सात-बारा उताऱ्यावरून समजते. त्यामुळे सात-बारा उताऱ्याला अधिक महत्त्व आहे. हस्तलिखित सात-बारा उताऱ्याचे रुपांतर डिजिटल सात-बारांमध्ये होताना काही उताऱ्यांत जमिनीच्या क्षेत्राची विसंगती, नावांमधील चुका झाल्या आहेत. हे सात-बारा बारकाईने न तपासल्याने चुका दुरुस्त करायच्या तशाच राहून गेल्या. आधी सात-बारा उताऱ्यातील चुका दुरुस्तीचे अधिकार तलाठ्यांना होते. आता मात्र ते तहसीलदारांना आहेत. सात-बारा बिनचूक व्हावेत, हे तपासण्याची जबाबदारी नायब तहसीलदार, तहसीलदार यांच्यावर सोपविण्यात आली होती.
सात-बारा दुरुस्तीची पद्धत
सात-बारा उतारा दुरुस्तीसाठी तहसीलदार कार्यालयात सर्व कागदपत्रांनीशी अर्ज दाखल करावा लागतो. त्यानंतर हा अर्ज मंडल अधिकारी यांच्याकडे जातो. तलाठी व मंडल स्तरावरून याबाबतचा अभिप्राय मागविला जातो. हा अभिप्राय आल्यानंतर संबंधित सात-बारा उताऱ्यावरील मालकांना नोटीस पाठवून त्यावर सुनावणी घेतली जाते. यानंतर क्षेत्रात दुरुस्ती अथवा नावात बदल करण्याचे आदेश तहसीलदार यांच्याकडून जारी केले जातात.
मुळशीतील शेतकऱ्याची आपबिती..
मुळशीतील एका शेतकऱ्याच्या नावावर सुमारे 70 गुंठे क्षेत्र होते. हस्तलिखित सात-बारा उताऱ्यावर तशी नोंद आहे. मात्र ऑनलाइन सात-बारा उताऱ्यावर फक्त 10 गुंठेच क्षेत्र असल्याचे दाखविले. याबाबत नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर शेतकरी म्हणाले, “याप्रकरणी तलाठी, मंडल अधिकारी यांचा चौकशी अहवालही दोन वर्षांपूर्वीच आलेला आहे. आता फक्त सुनावणी घेऊन आदेश काढणे बाकी आहे. सुनावणीची नोटीस देण्यासाठी लिपिकांना भेटलो असता, ते सांगतात की तहसीलदार यांना भेटा. त्यांनाही भेटलो. मात्र, मागील दोन वर्षांपासून सुनावणीची नोटीसही काढण्यात आलेला नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही भेटलो. त्यांनी सांगूनही सात-बारा उताऱ्यातील दुरुस्तीची प्रक्रिया सुरू झाली नाही.’
तालुका – विसंगती असलेले सात-बारा उतारे
जुन्नर – 27
वेल्हा – 24
पुणे शहर – 45
आंबेगाव – 60
शिरुर – 431
खेड- 302
भोर- 485
पुरंदर – 368
बारामती – 373
मावळ – 686
पिंपरी चिंचवड – 472
इंदापूर – 435
दौंड – 488
मुळशी – 502
हवेली – 2825