आंतरराष्ट्रीय मार्शल आर्टमध्ये सक्रिय असलेल्या अपर्णा राजवत यांनी 2018 ला ‘मिशन पिंक बेल्ट’ या उपक्रमाला सुरुवात केली. तेव्हा त्यांनी दीड लाख महिलांना ‘सेल्फ डिफेन्स’ ( स्वरक्षक )चे ट्रेनिंग देऊन वर्ल्ड गिनीज बुक मध्ये नाव पटकावले. राजवत यांनी आता पिंक बेल्ट मिशनच्या माध्यमातून एका यंत्रणेची निर्मिती केली असून याबाबतची माहिती त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात…
‘पिंक बेल्ट मिशन’ ही संकल्पना नेमकी काय आहे?
जेव्हा निर्भया हत्या प्रकरण झाले तेव्हा मी लंडन मध्ये होते आणि या प्रकरणानंतर मी आपल्या देशातील प्रत्येक महिलांसाठी लढा देण्याचं ठरवलं . 2018 पासून पिंक बेल्ट मिशनच्या माध्यमातून ‘सेल्फ डिफेन्स’ या उपक्रमाला सुरुवात केली आणि जवळ जवळ दीड लाख महिलांना सेल्फ डिफेन्सची कला शिकवून वर्ल्ड गिनीज बुक मध्ये देखील नाव पटकावले. मात्र केवळ सेल्फ डिफेन्स पुरेसे नाही हे जेव्हा कळले तेव्हा या यंत्रणेची संकल्पना सुचली. मात्र ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आर्थिक पाठबळ असणे गरजेचे आहे यासंदर्भात आम्ही सरकारकडे मागणी देखील करणार आहोत.
सध्या आम्ही आय वॉन्ट माय पिंक बेल्ट (I want my pink belt) असा उपक्रम सुरू केला आहे. या माध्यमातून जगातील केवळ स्त्रीवर्गालाच नाही तर पुरुषांनादेखील या याचिकेवर स्वाक्षऱ्या (आपलं नाव , ई-मेल अड्रेस, आणि मोबाईल नंबर भरणे) करायला लावत आहोत आणि जेव्हा 50,000 स्वाक्षऱ्या होतील तेव्हा या यंत्रणेला सत्यात उतरवण्यासाठी आम्ही सरकारला मागणी करणार आहोत. ही कल्पना केवळ याचिकेवर स्वाक्षऱ्या करण्यापूरतेच मर्यादित न ठेवता शासनाच्या आणि जनतेच्या मदतीने या नवीन कल्पनेच्या जोरावर लोकांचे आयुष्य बदलण्याचे ध्येय मिशन पिंक बेल्टचे आहे.
ही यंत्रणा बनवण्याची गरज का पडली? आणि ही यंत्रणा तयार कधी पर्यंत होईल?
गेले आठ महिने मुंबई मधील IT टीम या यंत्रणेसाठी काम करीत आहे. ही यंत्रणा कशी असणार आणि कोणकोणत्या गोष्टींचा यात समावेश असणार या सर्व बाबी तयार आहेत मात्र सरकारच्या माध्यमातून पोलीस , वैद्यकीय सुविधा, त्यात असणाऱ्या सिम कार्डसाठी मोबाईल शॉपी शी ते कनेक्ट केले जाईल. स्वरक्षक च्या बळावर आपण स्वतःला वाचवू शकतो. मात्र जर हल्ला करणाऱ्यांची संख्या ही 4 पेक्षा अधिक असेल तर ते थोडे अशक्य होते. मात्र ही यंत्रणा अश्यावेळी प्रत्येक मुलींसाठी, महिलांसाठी, मुलांसाठी सुद्धा उपयुक्त ठरू शकते. कारण बलात्कार हा जेंडर प्रॉब्लेम नसून ही एक सामाजिक समस्या आहे आणि म्हणूनच या यंत्रणेची गरज आहे.
आपल्या सोबत काहीतरी वाईट होणार आहे हे जेव्हा समजते तेव्हा आपण आपल्या जवळील व्यक्तींना कॉन्टॅक्ट करतो मात्र बऱ्याच वेळा यात वेळ जातो आणि एका क्षणात होत्याच नव्हत होतं. बऱ्याचदा असे देखील ऐकायला मिळाले, अश्या पद्धतीचा अपघात झाल्यास अर्धा अर्धा तास ती व्यक्ती तिथेच पडून असते तिला लवकर वैद्यकीय सुविधा मिळत नाही आणि तिला जीव गमवावा लागतो या सर्वांवर तोडगा म्हणून या यंत्रणेची निर्मिती गरजेची आहे जेणेकरून अपघात होण्याआधी पोलीस मध्ये सिग्नल देऊन हा अनर्थ टाळला जाऊ शकतो किंवा अपघात जरी झाला तरी त्या व्यक्तीला वैद्यकीय सेवा लवकर उपलब्ध होण्यासाठी याची मदत होऊ शकेल.केवळ बलात्कारच नाही तर घरगुती हिंसाचाराच्या घटना देखील वाढल्या आहेत त्यासाठी सुद्धा ही यंत्रणा सक्षम आहे.
ही यंत्रणा काम कशी करणार?
या यंत्रणेचा उद्देश खूप मोठा आहे. या उत्पादनाच्या संकल्पनेचे डीजाईन बनविताना त्यात एक बटन असेल अशी रचना केली आहे. हे बटन दाबल्यावर एक धोक्याची सूचना इतरांना पाठवली जाईल. ही सूचना जवळील पोलीस स्टेशन ला पोहचली जाईल. ही सुरक्षा यंत्रणा दीर्घकाळ टिकावी म्हणून सिलिकॉन केसिंगचे आवरण असेल आणि तुमच्या जीपीएस लोकेशनच्या संबधित इतर कार्यानुरूप सुविधा असतील आणि यासाठी इंटरनेट ची आवश्यकता नाही. यामध्ये अंतर्गत सेन्सरची सुविधा असणार आहे जे अत्यंत जोराचा धक्का बसल्यावर सक्रिय होतील त्यामुळे हे उपकरण खेचण्याचा आणि तोडण्याचा प्रयत्न जरी केला तरी आपोआप एक धोक्याची सूचना पीडित व्यक्तीच्या ठिकानासह पाठवली जाईल.
ही यंत्रणा सामान्य लोकांना परवडणार का?
ते संपूर्णतः सरकारवर अवलंबून असणार आहे मात्र प्रयत्न हाच असणार आहे की शक्य असेल तेवढी किंमत कमी ठेऊ गरज भासल्यास मोफत वाटप देखील केले जाईल कारण ही यंत्रणा जगाच्या प्रत्येक कोपऱ्यापर्यंत पोहचली पाहिजे.
ग्रामीण भागातील महिला ज्यांना हे तंत्रज्ञान ज्ञात नाही अश्यांसाठी तुमचा काही उपक्रम आहे का?
यासाठी आम्ही प्रत्येक राज्यात कॅम्पेन चालवत आहोत मात्र तरीही तुम्ही सर्वांनी ही स्वतःची जबाबदारी मानून शक्य होईल तितके याबाबतीत लोकांना जागृत करणे गरजेचे आहे कारण आधी आपण एकमेकांसाठी उभे राहण्यासाठी शिकले पाहिजे.
या यंत्रणेविषयी कोणती शंका नागरिकांमध्ये असेल तर संपर्क कसा साधावा?
पिंक बेल्ट मिशन सर्व शंका दूर करण्यासाठी सक्षम आहे तुम्ही कधीही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता.
(लिंक: https://pinkbeltmission.org/iwantmypinkbelt/ )