मुंबई, दि.18- अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने चालू वर्षात व्याजदर कमी पातळीवर ठेवण्याचे आश्वासन दिल्यानंतर जागतिक शेअर बाजाराच्या निर्देशांकात सुधारणा झाली. मात्र भारतामध्ये करोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे गुंतवणूकदारांनी विक्रीचा चालूच ठेवली. त्यामुळे आज सलग पाचव्या दिवशी शेअर बाजार निर्देशांकात मोठी घट नोंदली गेली.
जागतिक तेजीनंतर सकाळी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेस 500 अंकांनी वाढला होता. मात्र नंतर करोनाचे रुग्ण वाढत असल्याची आकडेवारी समोर आल्यानंतर विक्रीचा जोर वाढला. बाजार बंद होताना सेन्सेक्स कालच्या तुलनेत 585 अंकांनी कोसळून 49,216 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 1.11 टक्क्यांनी म्हणजे 163 अंकांनी कोसळून 14,557 अंकांवर बंद झाला.
गेल्या पाच सत्रात सेन्सेक्स 2,062 अंकांनी तर निफ्टी 616 अंकांनी कमी झाला आहे.
या विक्रीमुळे आज गुंतवणूकदारांचे आज 3 लाख कोटी रुपयांचे तर गेल्या पाच दिवसात 9 लाख कोटी रुपयाचे नुकसान झाले. गेल्या पाच दिवसापासून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या तेजीत हात्या. मात्र आज त्यांनी सपाटून मार खाल्ला. इन्फोसिस, टीसीएस, टेक महिंद्रा या कंपन्यांच्या शेअरच्या भावात मोठी घट नोंदणी केली. त्याचबरोबर रिलायन्स इंडस्ट्रीज, एनटीपीसी, डॉ. रेड्डीज या कंपन्यांना नफेखोरीचा फटका बसला.
या घटनाक्रमाला बाबत अँजेल ब्रोकिंगचे विश्लेषक समित चव्हाण यांनी सांगितले की, काल शेवटच्या सत्रात बरीच खरेदी झाली होती. त्याचबरोबर आज सकाळी बाजारात फेडरल रिझर्व्हच्या धोरणामुळे तेजीचे वातावरण होते. मात्र नंतर विक्री वाढत गेली. गुंतवणूकदार काही बड्या कंपन्यातून नफा काढून घेत असल्याचे वातावरण सध्या बाजारात आहे.
सध्याच्या परिस्थितीमध्ये निफ्टीला 14,470 अंकावर आधार असल्याचे दिसते. गेल्या पाच दिवसांमध्ये बॅंकिंग क्षेत्राचा निर्देशांक जास्त प्रमाणात घसरत आहे. त्यामुळे शेअर बाजारात नकारात्मक वातावरण तयार झाले आहे. माहिती तंत्रज्ञान, ऊर्जा, आरोग्य, रिऍल्टी, भांडवली वस्तू या क्षेत्रातील कंपन्यंच्या शेअरची आज जास्त प्रमाणात विक्री झाली. मिड कॅप व स्मॉल कॅप 1.5 टक्क्यापर्यंत कोसळले