18 वर्षांवरील सर्वांना लस देण्यासाठी नियोजन
पुणे -जिल्ह्यात लसीकरणाचा वेग आणखी वाढविण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. मागील दहा दिवसांत राज्यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक लसीकरण झाले. पुढील दोन दिवसांत जिल्ह्यात 75 ते 80 हजार लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. त्यानंतर 3 ते 4 दिवसांत 1 लाख लसीकरणाचे उद्दिष्ट आहे.
सद्यस्थितीत 45 वर्षांवरील व्यक्तींना करोनाची लस देण्यात येत आहे. जिल्ह्यात 45 वर्षांवरील व्यक्तींची संख्या सुमारे 28 लाख आहे. त्यामुळे पुढील 30 दिवसात लसीकरणाचा हा टप्पा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
जर केंद्र शासनाने 18 वर्षांवरील सर्वांना लसीकरणाची परवानगी दिली तर 100 दिवसांत लसीकरणाची मोहीम पूर्ण करण्याचे लक्ष निर्धारित केले आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली. 18 ते 45 वर्षांपर्यंतीची संख्या सुमारे 74 ते 76 लाख आहे. जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात लसीकरण पूर्ण होऊ शकते, असेही राव यांनी स्पष्ट केले.
मागील दहा दिवसांची आकडेवारी पाहता लसीकरणामध्ये राज्यात पुणे जिल्हा पुढे आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढविणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील करोनाबाधितांची आकडेवारी पाहता विशेष बाब म्हणून 18 वर्षांवरील सर्वांना लस देण्याची आवश्यकता आहे. यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येत आहे.
केंद्र सरकारने विशेष बाब म्हणून लसीकरणासाठी परवानगी देणे आवश्यक असल्याचे राव यांनी सांगितले. ही परवानगी मिळाली तर 100 दिवस लसीकरण पूर्ण केले जाईल. यासाठी मिशन 100 डेज आखले आहे.