येरवडा -ऑक्सिजन बेड मिळवण्यासाठी रात्रभर सर्वच रुग्णालयांत धावाधाव केलेल्या रामवाडीतील एका करोना बाधित ज्येष्ठ नागरिक महिलेला अखेरपर्यंत ऑक्सिजन बेड मिळाला नाही. त्यामुळे त्याचा रस्त्यातच मृत्यू झाला. ही गंभीर घटना शुक्रवारी सकाळी घडली.
रामवाडी गावातील अरुल मेरी ऍन्थोनी (वय 73) यांना दि. 1 रोजी करोना संसर्गाचे निदान झाले. रात्री 8 वाजता येरवड्यातील संत ज्ञानेश्वर वसतिगृह करोना केंद्रातील अधिकाऱ्यांनी “ऑक्सिजनची लेवल कमी झाली आहे. तुम्हाला ऑक्सिजनची गरज लागेल,’ असे सांगत त्यांनी बाधितेला ससूनला पाठवले. पण, तेथे ऑक्सिजन बेड शिल्लक नसल्याने त्यांना रुग्णालयाबाहेर थांबावे लागले. तेथून जम्बो कोविड रुग्णालयात नेले. सुरक्षारक्षकांनी “हेल्पलाइनवर माहिती द्या, समुपदेशकांनी सांगितल्यानंतर आम्ही बेड देऊ’ असे सांगितले.
दरम्यान, कोविड हेल्पलाइनचा नंबर दीड तास व्यस्त होता. यानंतर समुपदेशकांनी माहिती घेतली आणि “तुम्हांला पाच मिनिटांत रुग्णालय कळवतो’ असे सांगितले. दरम्यान हेल्पलाइनवरून कोणताही निरोप आला नाही. बेड मिळावा, यासाठी सर्वत्र चौकशी केली.
पण, बेड नसल्याचे सांगितले जात होते. मुलांनी नगर रोडवरील रुग्णालयात आईला नेले. मात्र, बेड उपलब्ध नसल्याने तेथूनही परत पाठवले. अखेर सकाळी खराडी बायपासजवळ त्यांचा गाडीतच मृत्यू झाला.
आईला ऑक्सिजन बेडची गरज होती. कोविड हेल्पलाइन सतत व्यस्त होती. बेड उपलब्ध नसल्याने कोठेही दाखल करून घेतले जात नव्हते. आईला पोर्टेबल बॉटलने ऑक्सिजन पुरवठा केला. माझी आई उपचाराविना रस्त्यामध्ये गेली. पालिकेच्या हेल्पलाइनवरून काहीच मदत मिळाली नाही. जम्बो कोविड आणि ससूनमध्ये जागा मिळाली नाही.
– आरकी दास ऍन्थोनी, करोनाबाधित मृताचा मुलगा