सेऊल – उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन आपला आक्रमकपणा सोडायला तयार नसून शेजारी राष्ट्रांना दमात घेण्यासाठी त्याच्याकडून सातत्याने आगळीक केली जात आहे. आता त्याचाच एक भाग म्हणून दोन दिवसांपूर्वी उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र चाचणी घेतली असून त्या देशाकडून लवकरच अणुचाचणी घेतली जाण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
या घटनाक्रमामुळे द. कोरियात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे व एकूणच त्या विभागात तणाव पसरला असल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती यून सक योल यांची आज भेट घेतली.
उत्तर कोरियाच्या चाचण्या या विभागात अस्थैर्य निर्माण करणाऱ्या असल्याची प्रतिक्रिया हॅरिस यांनी दिली आहे. चीनही तैवानमध्ये आगळीक करण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे या भागात चांगलीच खदखद निर्माण झाली आहे.
तैवानचे अमेरिका रक्षण करेल असा शब्द अमेरिकेने त्या देशाला दिला आहे. तर द. कोरिया आणि जपानही आपल्या संरक्षणविषयक गरजांसाठी प्रामुख्याने अमेरिकेवरच अवलंबून राहीले आहेत. चीन आणि उत्तर कोरियाच्या या उद्दामपणे जगात पुन्हा आणखी एका युध्दाला तोंड फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही असे जाणकारांनी म्हटले आहे.
उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्या सीमांची जेथे विभागणी करण्यात आली आहे तो भाग लष्कररहित करण्यात आला आहे. तेथेही कमला हॅरिस यांनी भेट दिली.
दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी जपानचे माजी पंतप्रधान शिंजो ऍबे यांच्या शासकीय अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहण्याकरता हॅरिस जपानला आल्या होत्या. उत्तर कोरियाकडून जपानच्या नागरिकांच्या अपहरणाच्या घटना अलिकडे घडत आहेत. त्याबद्दल जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी हॅरिस यांच्याशी चर्चा केली होती. त्यावर उत्तर कोरियाकडून नाराजीची प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
युक्रेनच्या नागरिकांचे रशियात सहभागी होण्याचे मत; 4 प्रांत होणार सामील