– माधव विद्वांस
मानवजातीच्या कल्याणाचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून रॉकफेलर प्रतिष्ठानाची स्थापना करणारे प्रसिद्ध अमेरिकन उद्योगपती जॉन डेव्हिसन रॉकफेलर यांचा आज स्मृतिदिन. रॉकफेलर यांचा जन्म 8 जुलै 1839 रोजी न्यूयॉर्कमधील रिचफोर्ड येथे झाला. लहानपणी त्यांनी बटाटे आणि अंडी विकून आईला मदत केली. त्यांचे कुटुंब परिस्थितीनुसार सतत गाव सोडून दुसरीकडे जात असे. कठीण परिस्थितीही त्यांनी आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण करून फॉलसॉम्स कमर्शियल कॉलेजमध्ये दहा आठवड्यांचा बुककीपिंगचा व्यवसाय अभ्यासक्रम पूर्ण केला. रॉकफेलर सोळा वर्षांचे असतानाच, हेविट अँड टटल नावाच्या छोट्या उत्पादन कमिशन फर्मसाठी सहाय्यक बुककीपर म्हणून त्यांना पहिली नोकरी मिळाली. कालव्याचे मालक, जहाजाचे कप्तान आणि मालवाहतूक एजंट यांच्याशी वाटाघाटी करणे या गोष्टी त्यांनी आत्मसात केल्या.
वर्ष 1859 मध्ये जॉन यांनी क्लार्क यांच्या भागीदारीत दलालीचा व्यवसाय सुरू केला. पेन्सिल्व्हेनियातील टिट्सव्हिल येथे 1859 मध्ये ड्रेक यांनी पहिल्या खनिज तेल विहिरीचा प्रयोग यशस्वी केला. वर्ष 1863 मध्ये रॉकफेलर यांनी “अँड्रूज, क्लार्क अँड कंपनी’ स्थापन करून तेलशुद्घीकरण उद्योग सुरू केला. दोन वर्षांनी “रॉकफेलर अँड अँड्रूज कंपनी’ स्थापण्यात आली. या उद्योगामध्ये भाऊ विल्यम यालाही त्यांनी भागीदार केले व क्लीव्हलॅंड येथे “विल्यम रॉकफेलर अँड कंपनी’ अशी दुसरी तेल कंपनी उभारली. वर्ष 1867 मध्ये वरील दोन्ही कंपन्यांचे “रॉकफेलर, अँड्रूज, फ्लॅंग्लर अँड कंपनी’ या एकाच कंपनीत एकत्रीकरण केले. कालांतराने “स्टॅंडर्ड ऑइल कंपनी ऑफ ओहायओ’ अशी एक संयुक्त भांडवली कंपनी उभारण्यात येऊन जॉन डी. रॉकफेलर अध्यक्ष बनले. 1882 मध्ये “स्टॅंडर्ड ऑइल ट्रस्ट’ या मोठ्या उत्पादनसंस्थेची स्थापना करण्यात आली.
या ट्रस्टच्या नियंत्रणाखाली अमेरिकेतील बहुतांश तेलउद्योग, खाणी, लाकूड कारखाने, वाहतूक उद्योग यांसारखे अनेक उद्योग होते. 1899 मध्ये ओहायओच्या सर्वोच्च न्यायालयाने शेर्मन ट्रस्टविरोधी कायद्यांनुसार वरील ट्रस्ट अवैध ठरविल्यामुळे त्यात आवश्यक ते बदल करण्यात आले. त्यानंतर ही कंपनी 1911 पर्यंत कार्य करीत राहिली. त्या काळी खनिज तेलपदार्थांचे जगभर अत्यंत कार्यक्षम पद्धतीने उत्पादन व विपणन करणारी सर्वांत मोठी कंपनी होती. 1911 मध्ये अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने या नियंत्रक कंपनीचे अनेक स्वतंत्र कंपन्यांमध्ये विभाजन करण्याचा आदेश दिला. त्यांनी तेल उद्योगातून मिळालेल्या प्रचंड नफ्यातील मोठा निधी लोहखाणी व न्यूयॉर्कमधील व्यापारी बॅंकिंग व्यवसायाकडे वळविला.
आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून समाजिक संस्थांना भरीव मदत केली. अनेक धर्मादाय संस्था उभारल्या.त्यांच्या दैनंदिन कामकाजासाठी लोककल्याणाची तळमळ व आस्था असणारे कर्तव्यदक्ष अधिकारी नेमले. अमेरिकेच्या दक्षिण राज्यांमधील अतिशय हलाखीची शैक्षणिक अवस्था सुधारण्यासाठी “जनरल एज्युकेशन बोर्ड’ हे मंडळ व “शिकागो विद्यापीठ’ या दोन्ही संस्था त्यांच्या प्रचंड देणग्यांमधून स्थापन झाल्या. 23 मे 1937 रोजी फ्लोरिडातील ऑरमोंड येथे त्यांचे निधन झाले.