बालसाहित्यिक, कवी, शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य ग. ह. पाटील यांचा आज स्मृतीदिन. त्यांचा जन्म जुन्नर तालुक्यातील पिंपळवाडी येथे 19 ऑगस्ट 1906 रोजी झाला. त्यांचे शालेय शिक्षण पुणे येथील न्यू इंग्लिश स्कूलमधे झाले. त्यानंतर बी.ए. पदवी प्राप्त झाल्यावर ते मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयामधून बी.टी. झाले.
काही काळ शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये नोकरी केल्यानंतर त्यांनी जळगाव, धुळे, बोर्डी येथे प्राध्यापक म्हणून काम केले. ते पुणे येथील ट्रेनिंग कॉलेज फॉर मेन या संस्थेचे प्राचार्य होते. त्यानंतर ते शिक्षणाधिकारी झाले. वर्ष 1992 मध्ये ते निवृत्त झाले. त्यानंतर शासनाच्या अनेक शैक्षणिक समित्यांवर त्यांची नियुक्ती झाली होती. त्यांच्या कविता पाठ्यपुस्तकात समाविष्ट झाल्या. त्यांच्या बालकविता वृत्तबद्ध असल्यामुळे त्या ठेक्यात म्हणता यावयाच्या व पाठही व्हायच्या. देवा तुझे किती सुंदर आकाश तसेच फुलपाखरू छान किती दिसते या कविता आजही लोकप्रिय आहेत.
ग. ह. पाटील हे बालसाहित्यिक होते. त्यांनी वयाच्या 25 व्या वर्षी बालगोपाळांसाठी “बालशारदा’ या ग्रंथाचे संपादन केले. त्या ग्रंथाला त्यांनी अभ्यासपूर्ण प्रस्तावनाही लिहिली होती. पुण्याला ट्रेनिंग कॉलेजचे प्राचार्य असताना त्यांच्या अध्यापनात प्रयोगशीलता असायची. लहान मुलांच्या ज्ञानात भर पडावी यासाठी मुलांना कसे लेखन करावे, याचे शास्त्रशुद्ध मार्गदर्शन लेखकांना मिळावे यासाठी त्यांनी महाराष्ट्रातील नवोदित लेखकांसाठी एक महिना कालावधीची कार्यशाळा पुणे येथे 1960 मध्ये भरविली होती. या शिबिरातून प्रशिक्षण घेतलेले अनेक लेखक बालसाहित्याच्या क्षेत्रात नावारूपाला आले. पुढे नमूद केलेल्या कवितेमधील ओळी मधून त्यांची हृदयाला भिडणाऱ्या भावशीलता दिसून येते व तो प्रसंगही डोळ्यापुढे तरळून जातो-
शर आला तो धावुनी आला काळ विव्हळला श्रावण बाळ
हा! आई गे! दीर्घ फोडूनी हाक तो पडला जाऊन झोक
ये राजाच्या श्रवणी करुणा वाणी हृदयाचे झाले पाणी
त्या ब्राह्मण पुत्रा बघुनी शोकाकुल झाला नृमणी
आसवे आणुनी नयनी तो वदला हा हंत तुझ्या नाशाला
मी पापी कारण बाळा
1 जुलै, 1989 रोजी त्यांचे निधन झाले.
डरांव डरांव, डरांव डरांव… का ओरडता उगाच राव?, अबलख वारूवरी बैसुनी येती हे पाटिल भरजरी शिरीं खुले मंदिल, पाखरांची शाळा भरे पिंपळावरती चिमण्यांची पोरे भारी गोंगाट करती, माझ्या मामाची रंगीत गाडी हो तिला खिलाऱ्या बैलाची जोडी हो, या ग. ह. पाटील यांच्या मुलांच्या आवडत्या कविता आहेत.
डॉ. लीला दीक्षित आणि ग. ह. पाटील यांच्या कन्या
डॉ. मंदा खांडगे यांनी संपादन केलेला बालशिक्षण : बालसाहित्य : विविध आयाम हा गौरवग्रंथ, त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त “प्रतिमा प्रकाशना’मार्फत प्रकाशित केला आहे. या ग्रंथात अठरा नामवंत लेखक, अभ्यासक व बालशिक्षण-तज्ज्ञांचे विविध अंगांनी लिहिलेले अभ्यासपूर्ण लेख आहेत. या ग्रंथाला महाराष्ट्र सरकारचा आणि बालकुमार साहित्य संमेलनाचा पुरस्कार मिळाला आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेने बालसाहित्यासाठी ग. ह. पाटील यांच्या नावाचा पुरस्कार ठेवला आहे.
माधव विद्वांस