प्रख्यात व्यंगचित्रकार, मुखपृष्ठकार, लेखक व व्यंगचित्र हे फक्त टिंगल व नकारात्मक रेखाटनासाठी नसून त्यांचा सकारात्मक उपयोग होऊ शकतो हे दाखवून देणारे शि. द. फडणीस यांचे आज वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन. त्यांचे संपूर्ण नाव शिवराम दत्तात्रेय फडणीस. त्यांचा जन्म बेळगाव जिल्ह्यातील भोज येथे 29 जुलै 1925 रोजी झाला. कोल्हापूर हे सर्व प्रकारच्या कलांचे माहेर समजले जाते.
कोल्हापूर परिसर ऐतिहासिक वास्तूंचे तसेच निसर्गरम्य आहे. मंदिरे, मंडई, पंचगंगा, आसपासची वनश्री तसेच रंकाळ्यासारख्या ठिकाणी स्केचिंगसाठी मुले जात असतात. फडणीसांनाही येथेच चित्रकलेचे धडे मिळाले व त्यांच्यातील चित्रकाराची त्यांना येथेच जाणीव झाली. ते चित्रकलेतली एलिमेंटरी आणि इंटरमीजिएट ग्रेडच्या परीक्षा पास झाले. उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर मुंबईतील जे. जे. कला महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला.
वर्ष 1945 मध्ये सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टसमध्ये शिकत असताना फडणीस यांनी मनोहर मासिकाला व्यंगचित्र पाठवले. प्रकाशित झालेल्या या कलाकृतीमुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला. त्यानंतर त्यांनी अधूनमधून लोकप्रिय झालेल्या मासिकांना कॉमिक स्ट्रिप्स पाठविण्यास सुरुवात केली. अनंत अंतरकर हे हंस मासिक चालवत होते. अंतरकरांच्या सूचनेनुसार, फडणीस यांनी एक पूर्ण पानाचे रंगीत चित्र तयार केले व जून 1951 च्या अंकाच्या मुखपृष्ठावर प्रकाशित झाले.
विनोदी, बहु-रंगीत कव्हरसह नंतरच्या कामाची ही सुरुवात झाली. वर्ष 1950 मधे अंतरकर यांनी मोहिनी नावाचे दुसरे मासिक काढले. त्यावेळी दिवाळी मासिकांच्या मुखपृष्ठांवर परंपरेने सुंदर तरुणींच्या किंवा लोकप्रिय चित्रपट अभिनेत्रींची चित्रे किंवा छायाचित्रे असायची. फडणीस यांनी मोहिनीच्या 1952च्या दिवाळी अंकासाठी व्यंगचित्र तयार केले. यात माउस प्रिंटचा शर्ट घातलेला एक माणूस आणि बस स्टॉपवर शेजारी उभ्या असलेल्या कॅट प्रिंटची साडी घातलेली स्त्री दाखवण्यात आली होती. या नवीन प्रकारच्या मुखपृष्ठ निर्मितीला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.
मुंबईत काम करत असताना फडणीस यांना शहरातील हवामान आणि जीवनशैली मानवली नाही. ते पुन्हा स्वगृही कोल्हापूरला आले व आपला स्टुडिओ सुरू केला. त्याचवेळी अंतरकर यांनी मुंबईहून आपले निवासस्थान हलवून पुण्यात स्थायिक होण्यासाठी आले. अंतरकरांनी फडणीसांना पुणे येथे येण्याबद्दल सुचविले व ते भविष्याचा विचार करून पुण्यात स्थायिक झाले. यावेळी फडणीस यांची व्यंगचित्रे मोहिनीच्या प्रत्येक महिन्याच्या अंकात छापली जातील असे ठरले. ही परंपरा, भागीदारी 50 वर्षे चालू होती. आता मोहिनीचे मासिक बंद झाले असले तरी दिवाळी अंक निघतो व त्यामध्ये त्यांना स्थान असतेच.
त्यांनी वर्ष 1963 ते 1975 या कालावधीत “माणूस’ आणि “सोबत’ या मराठी साप्ताहिकांसाठी तत्कालीन घटनांवर आधारित राजकीय आणि सामाजिक व्यंगचित्रे रेखाटली. फडणीसांनी बालचमूसाठी चित्रित केलेली प्राथमिक गणिताची पुस्तके काढली. चित्रांच्या माध्यमातून गणित ही संकल्पना अतिशय सोप्या पद्धतीने मांडली.
त्यांच्या प्रकाशनानंतरच्या वीस वर्षांत, आठ भाषांमधील या सचित्र पुस्तकांच्या असंख्य प्रती दूरदूर पसरल्या आहेत. चित्रकारांची चित्रे त्यांच्या परवानगीशिवाय वापरली जाऊ नयेत यासाठी शि. द. फडणीस यांनी कायद्याच्या मदतीने प्रताधिकाराचे म्हणजे कॉपीराइटचे हक्क चित्रकारांना मिळवून दिले. त्यांच्या चित्रांची प्रदर्शने जर्मनी, इंग्लंड, अमेरिका या देशांमध्ये सादर केली गेली तसेच त्यांना अनेक गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना दीर्घायुरोग्य लाभो.