“यूनो’त हिंदीतून भाषण करण्याची मनीषा
नवी दिल्ली – परराष्ट्रमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांनी लोकसभेत अशी इच्छा प्रगट केली, की भारताचा नवा परराष्ट्रमंत्री या नात्याने मी यूनोच्या बैठकीत हिंदी भाषेत भाषण करावे. हिंदी भाषा ही यूनोची एक अधिकृत भाषा बनावी, असे मला मनापासून वाटते. पण त्यासाठी आपल्या देशाला 6 कोटी रुपये खर्चावे लागतील. वाजपेयी पुढे म्हणाले, मी मंत्री झाल्यापासून माझ्या खात्याचे कारभारात हिंदी भाषेचा वाढता उपयोग सुरू केला आहे. परदेशांशी केलेल्या कराराचे हिंदीत भाषांतर केले जाते.
तीर्थक्षेत्रांत आता यात्राकर नाही
मुंबई- पंढरपूर, आळंदी, पैठण आदी तीर्थक्षेत्रांत “यात्रेकरू कर’ नगरपालिकांनी वसूल करू नये, असा आदेश महाराष्ट्र शासनाने दिला आहे. याऐवजी शासन या नगरपालिकांना वसुलीचा खर्चवजा जाता उरणाऱ्या कराच्या रकमेच्या 75 टक्के इतकी रक्कम अनुदान म्हणून देईल.
व्याज दरमहा आकारावे
मुंबई – व्यापारी बॅंकांनी जुलैपासून कर्जावर व्याज आकारताना ते तिमाही दराने न आकारता मासिक दराने आकारावे, असा सल्ला रिझर्व्ह बॅंकेने दिला आहे.