मराठा आंदोलनाच्या गनिमी काव्यासाठी कडेकोट बंदोबस्त
मराठा आरक्षणासंदर्भात दोन दिवसांत निर्णय
पुणे – सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने राज्यभर मराठा क्रांती मोर्चा व संलग्न संघटनांकडून आंदोलने करण्यात येत आहेत. याचा परिणाम म्हणून मंत्र्यांच्या भेटी व दौऱ्यांच्यावेळी काळे झेंडे दाखवून मराठा आंदोलकांकडून गाड्या अडवण्याची शक्यता असल्याचा इशारा राज्य गुप्तचर विभागाने दिला आहे. यामुळे राज्यभरात मंत्र्यांच्या दौऱ्याचा काळात कडक बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत.
मराठा आंदोलक कार्यकर्ते हे मंत्र्यांच्या भेटी व दौऱ्यावेळी काळे झेंडे दाखवून त्यांच्यासमोर निदर्शने करण्याची शक्यता असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाल्याचे पोलिसांना दिलेल्या आदेशात म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी, उपायुक्त, सहायक आयुक्त व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी त्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील गोपनीय यंत्रणा सतर्क करण्यात येऊन मराठा संघटना कार्यकर्त्यांच्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच मंत्र्यांच्या दौऱ्यावेळी पुरेसा बंदोबस्त लावण्यात यावा. योग्य त्या प्रतिबंधात्मक योजना करून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आदेश राज्यभरातील पोलिसांना देण्यात आले आहेत.
आंदोलकांना पाठवल्या नोटीस
मराठा समाजाच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गुरुवारी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालण्याचा इशारा देण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर मोर्चातील प्रमुख कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. सभा किंवा मिरवणुका काढण्यास बंदी आहे. कोणत्याही प्रकारची निदर्शने, धरणे-आंदोलन, बंद पुकारणे व उपोषणासारख्या कार्यक्रमांना बंदी आहे. या आदेशाचे उल्लंघन करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल,’ असे या नोटीसमध्ये म्हटले आहे.