इंदोरीकर महाराजांच्या खटल्याची उद्या सुनावणी

संगमनेर -अपत्यप्राप्तीसंदर्भात जाहीर कीर्तनातून केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्या विरोधात प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान कायद्यांतर्गत संगमनेरच्या प्रथमवर्ग न्यायालयात खटला दाखल झाला आहे. त्यांच्या विरोधातील सुनावणीला त्यांनी वकीलामार्फत जिल्हा सत्र न्यायालयात अपिल दाखल केले होते.

 त्यानुसार आज झालेल्या कामकाजात अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या वतीने दाखल केलेल्या हस्तक्षेप अर्जाला हरकत घेतल्याने या प्रकरणाची पुढील सुनावणी 18 सप्टेंबर रोजी होणार आहे, अशी माहिती इंदोरीकर यांचे वकील के. डी. धुमाळ यांनी दिली. 

स्त्री संग सम तिथीला झाला, तर मुलगा होतो. विषम तिथीला झाला, तर मुलगी होते आणि स्त्री संग जर अशुभ वेळेला झाला, तर औलाद रांगडी, बेवडी व खानदान मातीत मिळविणारी होत असल्याचे विधान इंदोरीकर महाराज यांनी केले होते. या विधानाची व्हिडिअ क्‍लिप सोशल माध्यमांवर झळकली होती.

या विधानामुळे त्यांच्याविरोधात घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर भवर यांनी गर्भधारणापूर्व व प्रसूतिपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्यान्वये 19 जून रोजी संगमनेर न्यायालयात खटला दाखल केला होता. त्यानुसार 3 जुलै रोजी संगमनेरचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी. डी. कोळेकर यांच्यासमोर सुनावणी झाली होती.

यावेळी सरकारी वकील ऍड. लीना चव्हाण यांनी सरकारची बाजू मांडली होती. तसेच या संदर्भात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बुवाबाजी संघर्ष विभागाच्या सचिव ऍड. रंजना पगार-गवांदे यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे पुराव्यानिशी तक्रार केली होती. या तक्रारीनुसार जिल्हा शल्यचिकित्सांनी खटला दाखल करण्याचे आदेश दिले होते.

आज या प्रकरणात साक्षीदार असलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बुवाबाजी संघर्ष विभागाच्या सचिव डॉ. पगार-गवांदे यांनी अंनिसला याप्रकरणी बाजू मांडण्याचा अधिकार असल्याचे सांगत हस्तक्षेप अर्ज दाखल केला होता. त्यास आपन हरकत घेतली. त्यामुळे 18 सप्टेंबर रोजी या प्रकरणी युक्तीवाद होणार आहे, असेही ऍड. धुमाळ यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.