पुणे-कामगार आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील करोनामुक्त झाले आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आंबेगाव तालुक्याचे मंत्री करोनामुक्त झाले असल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
गेल्या महिन्यात 29 ऑक्टोबरला दिलीप वळसे पाटील यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांनी स्वतःला क्वारंटाइन केले होते, त्याचबरोबर असलेल्या सर्वांना त्यांनी करोना चाचणी करून घेण्याचे आवाहनही ट्वीटद्वारे केले होते.
याच दरम्यान 30 ऑक्टोबरला वळसे-पाटील यांचा वाढदिवस होता, करोनाच्या या पार्श्वभूमीवर आधीच त्यांनी साधेपणाने वाढदिवस साजरा करणार असल्याचे जाहीर केले होते; पण आदल्याच दिवशी त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांचा वाढदिवस झालाच नाही. मात्र, आता त्यांची करोना चाचणी निगेटिव्ह आली असून, पुढील काही दिवस त्यांचे वास्तव्य मुंबईतच असणार आहे.
माझी प्रकृती ठीक असून, आपणा सर्वांचे आशीर्वाद, प्रार्थना आणि माझ्यावर उपचार करणारे करोनायोद्धे डॉक्टर, नर्सेस, सपोर्ट स्टाफ यांच्या प्रयत्नांमुळे मी करोनामुक्त होऊन रुग्णालयातून आज घरी परतलो आहे. माझ्या उत्तम प्रकृतीसाठी सदिच्छा व्यक्त करणाऱ्या सर्व हितचिंतकांचा मी मनापासून आभारी आहे.
– दिलीप वळसे पाटील,
कामगार आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री