पाटण – महाविकास आघाडीच्या पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदार संघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी तालुक्यातील एकमेकांचे कट्टर विरोधक असणारे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई व सत्यजित पाटणकर हे एकाच व्यासपीठावर आले. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणारे दोन्ही नेते एकत्र आल्याने कार्यकर्त्यांनी भुवया उंचावल्या. या दोनही नेत्यांची एका व्यासपीठावर येण्याची पाटण तालुक्यात चांगलीच चर्चा रंगली आहे.
दरम्यान, पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारसभेच्या निमित्ताने दोन ध्रुवजवळ आल्याचे दिसून आले. सातारा जिल्हा क्रांतिकारकांचा जिल्हा आहे. निवडणुकांच्या आधी कोणालाही वाटले नव्हते तीन पक्षांची महाआघाडी स्थापन होईल. मात्र शरद पवार साहेबांनामुळे हे शक्य झाले आहे. त्यामुळे आता आपण सगळे एकत्र झालो आहोत, हा क्षण होऊ घातलेल्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील विजयाचा साक्षीदार व्हावा, असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.
ना. शंभूराज देसाई म्हणाले, पाटण तालुक्यातून जास्तीत जास्त मतदान दोन्ही उमेदवारांना देण्याची जबाबदारी आपली आहे. यासाठी तिनी पक्षाच्या नेते व कार्यकर्त्यांनी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. दरम्यान सत्यजित पाटणकर यांच्या भाषणातील धागा पकडत मंत्री देसाई यांनी केवळ शिक्षक व पदवीधर असे नव्हे तर इथून पुढच्या सर्व निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढवेल, असा विश्वास व्यक्त केला पुढील पंधरा वर्ष महाविकास आघाडीची सत्ता राज्यात राहणार आहे.
सत्यजित पाटणकर म्हणाले, राज्याबरोबर तालुक्यात पहिल्यांदाच तिने पक्ष एकत्र आले आहेत. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. भाजपाकडून सातत्याने नेतृत्वावर टीका केली जात आहे. याचा निषेध करण्याची नामी संधी मिळाली आहे. आम्ही एकत्र आल्यामुळे तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे. विरोधकांकडून यामुळे अफवाही पसरविल्या जातील त्यामुळे अशा अफवांवर विश्वास ठेवू नये.
पायात पाय घालायचा नाही
पाटण तालुक्यात निवडणूक आल्या की पायात पाय घालण्याची सवय आहे. मात्र यावेळी कोणी कोणाच्या पायात पाय घालायचा नाही. त्यामुळे नुकसान आपले होत आहे, असे पाटणकर यांनी सांगितले. मात्र पाटणकरांचा रोख कोणाकडे होता याची चर्चा उपस्थितांमध्ये होती.