पुणे – व्हेल माशाची उलटी (अम्बेरग्रिस) विकण्यासाठी आलेल्या सहा जणांना वनविभागाने पिंपरी-चिंचवड शहरात रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून तीन किलो संबंधित पदार्थ जप्त करण्यात आला आहे. पुणे परिसरात पहिल्यांदाच अशी कारवाई करण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात या पदार्थाची किंमत कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे.
व्हेल माशाची उलटी विकण्यासाठी काही जण चिंचवड येथील पूर्णानगर येथे येणार असल्याची माहिती वनविभागाला मिळाली. त्यानुसार बनावट गिऱ्हाईक बनवत सापळा रचण्यात आला.
याप्रकरणी मुहंमदनईन चौधरी (58), योगेश्वर साखरे, (25, रा.बालेवाडी), अनिल कामठे (45, रा. फुरसुंगी), ज्योतिबा जाधव (38), कृष्णात खोत (59) आणि 44 वर्षीय महिलेस रंगेहाथ पकडण्यात आले. ही कार्यवाही उपवनसंरक्षक राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहयक वनसंरक्षक मयूर बोठे, भांबुर्डा वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ,वनपाल महेश मेरगेवाड, विजय शिंदे, वनपाल, सुरेश बलें, वनरक्षक रामेश्वर तेलंग्रे, महादेव चव्हाण, गणेश पाटील व इतर वनकर्मचारी यांनी पार पाडली.
यासाठी होते तस्करी
व्हेल माशाच्या उलटीचा वापर परफ्युम, विशेषत: कस्तुरीसारखे सुगंध तयार करण्यासाठी होतो. दुबईसारख्या देशांत जेथे मोठ्या परफ्यूम मार्केट आहे, तेथून या पदार्थाला जास्त मागणी असल्याचे मानले जाते. तर काही ठिकाणी पारंपरिक औषधांमध्येही या उलटीचा वापर होतो. बाजारात यासाठी कोट्यवधी रुपये मिळतात.