नगर -जिल्ह्यातील श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, नगर तालुका, पाथर्डी, शेवगांव व राहुरी परिसरामध्ये गेल्या दोन ते तीन महिन्यात एकूण 17 ठिकाणी घरफोडी करणारी बीड जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेने पकडली. त्यांच्याकडून 42 तोळे (419 ग्रॅम) सोन्याचे दागिने, रोख रक्कम व तीन मोटारसायकल असा मिळून एकूण 23 लाख 52 हजार 500 रुपये किंमतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला. यापैकी चार जणांना जेरबंद करण्यात आले.
नगर तालुका हद्दीतील चास गावात आनंदा बबन घुगार्डे हे कुटुंबासह कामानिमित्त बाहेर गेले असताना चोरट्यांनी त्यांचे बंद घर फोडून घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 2 लाख 32 हजार 600 रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला होता. याबाबत नगर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचप्रमाणे श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, नगर तालुका, पाथर्डी, शेवगाव व राहुरी परिसरामध्ये अशा प्रकारचे जबरी चोरी व घरफोडीचे गुन्हे घडलेले असल्याने पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी स्वतंत्र पथक नेमून तपास करत गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सुचना दिल्या होत्या.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सहायक पोलिस निरीक्षक उपनिरीक्षक सोपान गोर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तपास सुरू केला. नगर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गुन्हा हा बीड जिल्ह्यातील आष्टी येथील सराईत गुन्हेगार राम बाजीराव चव्हाण व त्याचे साथीदारांनी मिळून केलेला आहे. राम चव्हाण व त्याचे साथीदार हे चोरलेले सोन्याचे दागिने मोडण्यासाठी दुचाकीवर नगर येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गुन्हे शाखेच्या पथकाने नगर-जामखेड रोड येथे जाऊन आठवड घाटात सापळा लावला. आष्टीकडून नगरच्या दिशेने तीन मोटार सायकलीवर प्रत्येकी दोन-दोन इसम येत असताना दिसले.
त्यांना थांबण्याचा इशारा करताच ते पळून जाण्याचे तयारीत असतांना पोलीस पथकाने दोन मोटार सायकलवरील चार चोटऱ्यांना पाठलाग करून पकडले. त्यांचे पाठीमागील युनिकॉन मोटार सायकलवरील दोघे गाडी तेथेच टाकून घाटामध्ये पळून गेले. राम बाजीराव चव्हाण (वय 20, रा. आष्टी, जिल्हा बीड), तुषार हबाजी भोसले, प्रविण उर्फ भाज्या हबाजी भोसले, विनाद हबाजी भोसले (रा.पिंपरखेड, ता. आष्टी जिल्हा बीड) यांना पकडले. प्रवीण भोसले याच्यावर नगर जिल्ह्यासह बीड जिल्ह्यातही गंभीर गुन्हे दाखल आहेत. या आरोपींकडून अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी व्यक्त केली.