काठावर बहुमत असलेल्या ठिकाणी धास्ती; गुलाल, फाटाके वाया जाण्याची भीती

सरपंचपदांसाठी खटाव तालुक्‍यात आज आरक्षण सोडत

पुसेगाव  : खटाव तालुक्‍यातील सरपंचपदांच्या आरक्षणाची सोडत उद्या, दि. 22 रोजी सकाळी 11 वाजता पंचायत समितीच्या बचत सभागृहात होणार आहे.ही आरक्षण सोडत दुसऱ्यांदा होत असून, यापूर्वी आपलेच आरक्षण आहे. असे समजून गुलालाची उधळण, फटाक्‍यांची आताषबाजी करत काढलेल्या काही मिरवणुकांवरील खर्च वाया जाण्याची शक्‍यता आहे. काठावरचे बहुमत असलेल्या गावांमधील पॅनेलप्रमुखांची धास्ती वाढली आहे.

मागील महिन्यात खटाव तालुक्‍यातील 90 ग्रामपंचायतींची निवडणूक झाली. त्यातील 13 ग्रामपंचायती बिनविरोध तर 20 ग्रामपंचायती अंशत: बिनविरोध झाल्या. उर्वरित ठिकाणी चुरशीच्या लढती झाल्या. निवडणुकीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप, राष्ट्रीय कॉंग्रेस, शिवसेना व इतर छोट्यामोठ्या पक्षांनी आपापल्या यशाचे दावे केले; परंतु सरपंच निवडीनंतरच कोणत्या गावावर प्रत्यक्षात कोणाचे वर्चस्व आहे, हे सिद्ध होणार आहे.

सरपंचपदांसाठी यापूर्वी झालेल्या आरक्षण सोडतीत सातेवाडी ग्रामपंचायतीत 20 वर्षांपेक्षाही अधिक काळ ओबीसी महिला प्रवर्गाचे आरक्षण निघाले नसल्याने, त्यावर आक्षेप घेण्यात आला. त्याचबरोबर दहा वर्षांपूर्वी सर्वसाधारण महिला आरक्षण असताना, पुन्हा एकदा तेच आरक्षण पडल्याने ओबीसी प्रवर्गातील सौ. कोळेकर या नवनिर्वाचित सदस्याने जिल्हाधिकारी कार्यालय व न्यायालयात धाव घेतली.

या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार, जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण तालुक्‍याची आरक्षण सोडत पुन्हा घेण्याचा निर्णय दिला. त्यामुळे अनेक ठिकाणची समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. कातरखटाव, उंबर्डे, येरळवाडी, वरुड, तडवळे, मांडवे, अंबवडे व अन्य काही ठिकाणी पॅनेलप्रमुखांची धास्ती वाढली आहे. तडवळे, अंबवडे येथील काही सदस्य बरेच दिवस सहलीला गेले होते. निवडणुकीची तारीख बदलल्याने त्यांना परत आणण्यात आले आहे.

आरक्षणाची होणार पडताळणी
आरक्षण प्रक्रियेसाठी 1995-2000, 2000-05, 2005-10, 2010-15, 2015-20 या कालावधीतील सरपंचाचे नांव, पहिल्या सभेच्या निवडीचा दिनांक, सरपंचपदाचा प्रवर्ग, एकूण कालावधी याची पडताळणी करण्याचा आदेश निवडणूक विभागाने पंचायत समितीमार्फत संबंधित ग्रामसेवकांना दिला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.