जिल्ह्यातील दूधसंकलनात मोठी वाढ; नोव्हेंबर महिन्यात दररोज 44 लाख लिटर दूध संकलन
नगर – जिल्ह्यात लम्पी स्किन आजार आता आटोक्यात येत आहे. तर दुसरीकडे या संकटाचा जिल्ह्यातील दुग्ध व्यवसायावर कोणताही परिणाम झालेला नाही. जिल्ह्यातील दुधाचे उत्पादन वाढताना दिसत आहे. मागील नोव्हेंबर महिन्यात दर दिवशी सरासरी खासगी, सहकारी, मल्टीस्टेट व इतर दूध संकलन केंद्रांद्वारे 44 लाख 26 हजार 392 लिटर दूध संकलित होत होते.
गेल्या दोन वर्षांपासून चांगला पाऊस होत असल्याने चारापिके वाढली आहेत. त्याचा परिणाम दूध उत्पादन वाढण्यात झाला आहे. विशेष म्हणजे, ऑगस्ट महिन्यापासून जिल्ह्यात लम्पी स्किन या घातक आजाराचा प्रादुर्भाव आहे, तरी देखील त्याचा दुग्ध व्यवसायावर परिणाम होत असल्याचे दिसले नाही. ऑगस्ट महिन्यात तर दररोज 35 लाख लिटर दूध संकलन होत होते.
जिल्ह्यात एकूण सहा लाख 52 हजार 663 दुधाळ जनावरे आहेत. यामध्ये चार लाख 68 हजार 492 संकरित गायी, 95 हजार 772 देशी गायी व 88 हजार 399 म्हशी आहेत. गायीच्या दुधाला 35 ते 38 रुपये लिटर भाव मिळत आहे. तर घर पोहोच रतीब घालणारे गायीच्या दुधाला 45 ते 50 रुपये तर म्हशीच्या दुधाला 50 ते 60 रुपये लिटरप्रमाणे दूध देत आहेत. या व्यतिरिक्त दुग्धजन्य खाद्य पदार्थ, पनीर, मिठाई या पदार्थांना सध्या मागणी जास्त आहे. परिणामी दुधाची मागणी वाढली आहे. नगर जिल्ह्यातील दूध परजिल्ह्यातही निर्यात होत आहे. या कारणांमुळे दुधाला मागणी वाढल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्यात सध्या दूध उत्पादनात वाढ होत आहे. परजिल्ह्यातूनही दुधाला मागणी वाढली आहे. लम्पी स्किन या आजाराचा जिल्ह्यातील दुग्ध व्यवसायावर कोणताही परिणाम झालेला नाही. मागील चार ते पाच महिन्यांच्या कालावधीतील दूध उत्पादनाची माहिती घेतली असता दूध उत्पादन वाढले आहे. सध्या दुधाला बऱ्यापैकी भाव मिळत आहेत. तसेच आगामी काळात दूध उत्पादन वाढण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.
येथे म्हशीच्या दुधाचा दुष्काळ
दूध संकलन केंद्रात संकलित होणारे सर्व दूध हे गायीचेच आहे. म्हशीचे दूध येथे येत नाही. याचे कारण म्हणजे, म्हशीच्या दुधाला बाहेर जास्त भाव आहेत. म्हशीच्या दुधाला 60 रुपये लिटरपर्यंत भाव मिळतो. घरोघर पोहोच होणाऱ्या रतीबाचे दूधही शक्यतो म्हशीचेच असते. त्यामुळे दूध संकलन केंद्रामध्ये शक्यतो म्हशीचे दूध दिसत नाही.
नोव्हेंबर महिन्यातील दैनंदिन दूधसंकलन (लिटरमध्ये)
सहकार : 5 लाख 99 हजार 576, खासगी : 24 लाख 94 हजार 423, मल्टिस्टेट : 37 हजार 590, इतर : 12 लाख 94 हजार 803
=======================