कडूस (वार्ताहर)- पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बारापाटी (कमान) या शाळेतील नवागत विद्यार्थ्यांचे ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून औक्षण करून स्वागत करण्यात आले. उत्तरार्धात याच शाळेतील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचा हृदयस्पर्शी निरोप समारंभ संपन्न झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त पणे मनोगत व्यक्त करत आपली शाळा आणि शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
वर्गशिक्षिका वैशाली मुके यांनी विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात नावलौकिक वाढवून गावाचे आणि आईवडिलांचे पांग फेडण्यासाठी भविष्यात प्रयत्न करण्याचे आवाहन करून सदिच्छा व शुभेच्छा दिल्या.
उपक्रमशील मुख्याध्यापक संजय नाईकरे यांनी द स्टुडंट्स ऑफ द इयर म्हणजेच आदर्श विद्यार्थी पुरस्काराची घोषणा करून प्रमुख अतिथी राजेंद्र लोथे यांच्या हस्ते कु. धनश्री आणि ओम नाईकरे या विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्यात आले.
याप्रसंगी कमान येथील शिक्षणप्रेमी ग्रामस्थं सोमनाथ नाईकरे, अर्चना सपाट, सोपान नाईकरे, राधाबाई नाईकरे, स्वाती नाईकरे, संतोष नाईकरे, आदी मान्यवर उपस्थित होते.